नवी दिल्ली । राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपति भवनात आयोजित करण्यात आलेल्या शानदार कार्यक्रमात राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदारसिंग आणि विश्वविक्रमी पॅरा ऑलिम्पियन देवेंद्र झाझरिया यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानीत केले. या कार्यक्रमात राष्ट्रपतिंनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासह अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कारांचे वितरण केले. यावेळी राष्ट्रपतिंनी निता अंबानी यांना रिलायंस फाऊंडेशन युथ स्पोर्ट्ससाठी राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार देऊन गौरवले. भारताचा मधल्या फळीतला फलंदाज चेतेश्वर पुजाराचे नावही अर्जुन पुरस्कार विजेत्यांच्या यादीत होते. पण सध्या तो काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये असल्यामुळे तो या कार्यक्रमाला हजर राहू शकला नाही. महिला विश्वचषक स्पर्धेत छाप पाडणार्या हरमनप्रीत कौरने यावेळी अर्जुन पुरस्कार स्विकारला. या कार्यक्रमात राष्ट्रपतिंनी 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार, तिघांना ध्यानचंद पुरस्कार आणि सात जणांना द्रोणाचार्य पुरस्कार देऊन गौरवले. खेलरत्न पुरस्कार विजेत्यांना साडे सात लाख रुपये, अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी पाच लाख रूपयांचा रोख पुरस्कार दिला जातो.
सात पैकी दोघांची निवड
यावेळी देण्यात आलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी सात जणांचे अर्ज आले होते. त्यात बॉक्सर मनोजकुमार आणि थ्रो बॉल खेळाच्या के टी रमण्णा यांचा समावेश होता. पण नंतरच्या छाननीत रमण्णाचे नाव वगळण्यात आले. रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणार्या चौघांनी खेल रत्न पुरस्कारासाठी अर्ज दिला होता. पण क्रीडा मंत्रालयाच्या एका नियमामुळे त्यातील तिघांचे नाव शर्यतीतून बाद झाले. अर्जुन पुरस्कार प्रथम दिला जातो त्यामुळे वरूण भाटी आणि मरियप्पन थंगवेलु यांना यावेळी अर्जुन पुरस्कार देण्यात आले. अर्जुन पुरस्कारासाठी यावेळी 82 अर्ज आले होते.
इतर पुरस्कार
तेनसिंग नॉर्गे साहसी पुरस्कार
प्रेमलता अग्रवाल, रोहन मोरे, ब्रिगेडियर अशोक अॅबे, ग्रुप कॅप्टन वेदप्रकाश शर्मा
अब्दुल कलाम आझाद ट्राफी
पंजाब विद्यापिठ, पातियाळा.
राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार
नीता अंबानी ( द रिलायन्स फाऊंडेशन)
संतोषकुमार (केंद्रिय विद्यालय )
संजयकुमार (आयबीसीओ, ओदिशा)
अमित लुथ्रा (द गोल्फ फाऊंडेशन).