देवेन्द्रजी जरा यांचीही मुळे शोधा !

0

वाहतूक शाखा हे केवळ पोलीस नावाच्या सागरातील हिमनगाचे टोक आहे. पोलिसांच्या सगळ्या शाखांत असाच आनंद आहे हे उभ्या महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही. सर्वात मोठी हुकूमशाही सध्या कुठे असेल असेल तर त्याचे उत्तर पोलीस खाते असे देता येईल. त्यामुळे आजवर अनेक सुनील टोके पुढे आलेत. परंतु, एकतर त्यांना वेडे ठरवले जाईल किंवा कशात तरी अडकवले तरी जाईल. टोकेंचे काय होते माहीत नाही, पण त्यांनी दाखवलेले धाडस महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री महोदय मोदींच्या स्वप्नाला जागत आपण मुंबई पोलिसांच्या या खाबुगिरीच्या मुळाशी जाणार आहात की नाही याची महाराष्ट्र वाट पाहत आहे.

आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द दीर्घकाळ विरोधी पक्षात गेल्यामुळे एखाद्या विषयावर तुटून पडणे आणि त्याची पाळेमुळे शोधून काढण्याचा चांगलाच सराव त्यांना झाला आहे. त्यामुळेच परवा गडकरी पुतळाप्रकरणी घशाला कोरड पडेपर्यंत त्यांनी घोषणा केली की.. पुतळा प्रकरणाचा मास्टर माइंड शोधून काढू.. त्याची पाळेमुळे खणून काढू. जे काय खणायचे आहे ते नक्कीच खणले पाहिजे. एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा त्यांचा स्वभाव मला तरी आवडला. कलियुगातले अवतार नरेंद्रजी मोदी यांच्या भ्रष्टाचारमुक्त भारत मोहिमेचे कटिबद्ध स्वयंसेवक देवेन्द्रजी ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या गृह खात्याच्या इज्जतीचे मुंबईत काल एका पोलीस हवालदाराने धिंडवडे उडवले. पोलीस खात्याची होती, नव्हती इभ्रत हायकोर्टाच्या साक्षीने पार गेट वे ऑफ इंडियावर टांगली. या वेळी हा गडी एवढा बहाद्दर निघाला की त्याने सगळे पुरावे आणि वाहतूक पोलिसांचे रेट कार्डच कोर्टाला सादर करून टाकले.

देवेन्द्रजी आता जरा यांचीही मुळे शोधा ना… मी बारा वर्षांपूर्वी मंत्रालयात बातमीदार म्हणून रुजू झाल्यावर मुंबई पोलिसांबद्दल एवढे ऐकले होते की मुंबई पोलीस हे नाव जरी कुणी काढले की माझी छाती अभिमानाने भरून यायची. याच काळात एका मित्राने जी माहिती दिली ती ऐकून माझ्या संवेदनाच काहीकाळ बधीर झाल्या होत्या. मुंबई पोलीस आयुक्ताची एका दिवसाची कमाई किमान 10 कोटी रुपये असल्याचे तो म्हणाला, आता यातले खरे काय नि खोटे काय? हे कसे तपासणार? असेल बाबा एवढी कमाई असे बोलण्याशिवाय पर्याय नव्हता. प्रत्यक्षात एक कोटी रुपये एकत्रित आजवर मी कधीच मोजले नाहीत. परंतु, त्याकाळात आमदार निवास परिसरात कोणत्याही आमदाराच्या खोलीत डोकावले की .. अशी कोटींची उड्डाणे कानावर पडायची. अमुकाचा 50 कोटींचा व्यवहार डन झाला, तमुकाचा 150 कोटींचा होण्यात आहे याची सवय झाली होती. पुढे आर. आर. पाटील गृहमंत्री झाल्यावर काही गोष्टी जवळून बघायला मिळाल्या आणि मित्र शंभर टक्के खोटे बोलत नाही याची खात्री पटली. महाराष्ट्राच्या पोलीस दलात प्रशासकीयदृष्ट्या राज्याचा पोलीस महासंचालक हे पद मोठे असले, तरी कमाईच्या बाबतीत मुंबई पोलीस आयुक्त हे पदच बलाढ्य समजले जाते. प्रत्येक आयपीएस अधिकार्‍याला जीवनात एकदा मुंबई पोलीस आयुक्त आणि आयएएस अधिकार्‍याला मुंबई मनपा आयुक्त का व्हावेसे वाटते यातली खरी गोम लक्षात घेतली पाहिजे. मुंबईमधील गुन्हे नियंत्रण शाखा किंवा एटीएसमधला साधा पीएसआय जर करोडपती असू शकतो, तर ही पदे तर सर्वात वरची आहेत. सामान्य माणूस कल्पनासुद्धा करू शकत नाही, अशी भयावह दुसरी बाजू आणि काळी किनार पोलीस दलाला आहे याची खात्री मला डान्सबार बंदीपूर्वीच्या स्थितीवरून पटली, आता त्यात थोडासा बदल झाला असेल या पलीकडे काही नाही. मुंबईतल्या सगळ्याच राजकीय पक्षांचे 70 टक्के राजकारण पोलीस दलावर का चालते याची उत्तरेसुद्धा या संबंधात सापडतात. एखादा प्रामाणिक अधिकारी गाठा आणि ऐका एकापेक्षा एक किस्से, त्यातून पोलीस अन् पुढारी यांचे अतूट नाते कळेल.

हे सगळे नव्याने सांगतो असे नाही. मुख्यमंत्र्यांना ते खोलात माहिती आहे. परंतु, आता पाणी डोक्यावरून वाहत असेल तर त्यांनी आपले मौन सोडले पाहिजे. पोलीस हवालदार सुनील टोके यांना हायकोर्टाची पायरी का चढावी लागली यावर फडणवीस चिंतन करणार आहेत की टोकेला मनोरुग्ण ठरवून मोकळे होणार आहेत हे पाहावे लागेल. सध्या सशस्त्र पोलीस शाखेत वरळी विभागात कार्यरत असणारे विलास टोके 1985 ला देशाची सेवा करण्याचे वेडे स्वप्न घेऊन पोलीस दलात दाखल झाले.

गोरेगावला काहीकाळ नोकरी झाल्यावर त्यांची 2013 ते 16 या काळात वडाळा वाहतूक शाखेत बदली झाली. तिथे आल्यावर त्यांना कळले की या शाखेत वर्णी लावण्यासाठीसुद्धा पैसे मोजावे लागतात याचा अर्थ सरळ होता की वाहतूक पोलिसांना वाहतूक सरळ नव्हे तर आपली आणि वरिष्ठांची आर्थिक घडी सरळ करायची असते. वाहतूक शाखेत पीआय राजरोसपणे दोघांची वसुलीसाठी नियुक्ती करतो, इतर विषयांसाठी अलिखित दरपत्रक तयार होते आणि याबाबत कोणत्याही वरिष्ठाला अप्रूप वाटत नाही याची या वेड्या हवालदाराला चीड आली. त्याने सगळ्यांना वरपर्यंत तक्रारी केल्या, स्मरण पत्रे दिलीत. पुरावे दिले, पण काही उपयोग झाला नाही. तो होतही नसतो उलट असा वेडा अडचण वाटायला लागतो, अनेक अधिकार्‍यांनी सुटी घेऊन उपचार घेण्याचा सुनील टोकेना सल्ला दिला, पण टोके ऐकायला तयार नव्हते. शेवटी, छळ, अडवणूक, बदल्या हे शुक्लकाष्ठ घेऊन टोके प्रामाणिकतेचे आपले टोक अधिक धारदार करीत राहिले त्यांच्या या संयमाला मानले पाहिजे. दरम्यानच्या काळात भ्रष्ट अधिकारी, त्यांची पद्धत, यांचे पुरावे गोळा करीत राहिले, गृह सचिव, पोलीस आयुक्त, मुख्यमंत्री यांनाही तक्रारी करून हातात न्याय पडत नाही म्हणून त्यांनी दत्ता माने या वकिलाची मदत घेऊन हायकोर्टात याचिका दाखल केली. आता 23 जानेवारीला त्यावर कोर्ट सुनावणी करणार आहे. वाहतूक शाखा हे केवळ पोलीस नावाच्या सागरातील हिमनगाचे टोक आहे.

पोलिसांच्या सगळ्या शाखांत असाच आनंद आहे हे उभ्या महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही. सर्वात मोठी हुकूमशाही सध्या कुठे असेल असेल तर त्याचे उत्तर पोलीस खाते असे देता येईल. त्यामुळे आजवर अनेक सुनील टोके पुढे आलेत. परंतु, एकतर त्यांना वेडे ठरवले जाईल किंवा कशात तरी अडकवले तरी जाईल. टोकेंचे काय होते माहीत नाही पण त्यांनी दाखवलेले धाडस महत्त्वाचे आहे, मुख्यमंत्री महोदय मोदींच्या स्वप्नाला जागत आपण मुंबई पोलिसांच्या या खाबुगिरीच्या मुळाशी जाणार आहात की नाही याची महाराष्ट्र वाट पाहत आहे.

पुरुषोत्तम आवारे पाटील
9892162248