मुंबई: ’देव तारी त्याला कोण मारी’, ही म्हण तंतोतत खरी ठरवणारी घटना रत्नागिरीहून दादर येथे येणार्या रेल्वेमधील प्रवाशांना अनुभवयास मिळाली. या धावत्या ट्रेनच्या शौचालयात एका महिलेने बाळाला जन्म दिला. त्यानंतर त्या महिलेचे बाळ धावत्या ट्रेनच्या शौचालयातून ट्रॅकवर पडले, मात्र तरीही हे बाळ सुरक्षित राहिले.
मूळची पश्चिम बंगालमध्ये राहणारी चंदना शाह या 26 वर्षीय महिलेने धावत्या ट्रेनमधील शौचालयात मुलाला जन्म दिला. आणि पुढचा सगळाच प्रकार काळजाचा ठोका चुकवणारा होता. कारण नुकतेच जन्माला आलेले हे बाळ कुसा स्टेशनजवळ चालत्या ट्रेनच्या शौचालयामधून थेट ट्रॅकवर पडले. हे पाहून असह्य वेदना होत असतानाही त्याच अवस्थेत चंदनाने हंबरडा फोडला. डब्यातील प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने साखळी खेचली आणि पुढे काही अंतरावरच गाडी थांबली. त्यानंतर ट्रेनच्या ड्रायव्हरने याबाबत स्टेशन मास्टर कार्यालयाला माहिती दिली. त्यानंतर जवळपासच्या ट्रॅकवर शोधाशोध सुरू झाला असता काही अंतरावर ट्रॅकवर बाळ दृष्टीस पडले. बाळ विव्हळतंय आणि हालचालही करत आहे, हे पाहून सगळ्यांच्याच चेहर्यावर हसू फुलले. मग तातडीने बाळ आणि बाळंतीणला जवळच्याच शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यासाठी कुसा गावचे रहिवासी, रेल्वे कर्मचारी हे तातडीने मदतीने धावून आले. आता दोघेही सुखरूप असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे धावत्या ट्रेनमधून पडूनही या बाळाला अगदी किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत.
दुसर्यांदा घडला असा चमत्कार
30 डिसेंबर 2015 या दिवशीही तनकपूर-बरेली पॅसेंजर ट्रेनमध्ये असाच प्रकार घडला होता. नेपाळ येथील पुष्पा नावाची गर्भवती महिला या ट्रेनमधून प्रवास करत होती. तिला अचानक प्रसव वेदना सुरू झाल्या आणि ती शौचालयात गेली. तिथे काही क्षणांतच ती प्रसूत झाली आणि तिचेही बाळ धावत्या ट्रेनच्या शौचकुपातून ट्रकवर पडले होते. त्यानंतर पुप्षानेही जोरदार हंबरडा फोडला, ट्रेन थांबवण्यात आली आणि बाळ ट्रॅकवर रडतांना दिसले.