नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे माजी विद्यार्थी नेता आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे युवानेता कन्हैया कुमार यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्यास मंजुरी दिल्ली सरकारने परवानगी दिली आहे. यावर कन्हैय्या कुमार यांनी देशद्रोहाचा खटला चालवण्यास मंजुरी दिल्याबद्दल केजरीवालांचे आभार मानले आहेत. तसेच या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्याची मागणी केली आहे.
कन्हैया कुमार यांनी ट्विट केलं, देशद्रोहाचा खटला चालवण्यासाठी मंजुरी दिल्याबद्दल दिल्ली सरकारचे आभार. दिल्ली पोलीस आणि सरकारी वकिलांनी आता हा खटला गांभीर्याने घ्यावा, अशी त्यांना विनंती. या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी व्हावी आणि या प्रकरणाचा न्यायालयातच न्याय व्हावा अशी मागणी त्याने केली आहे. तसेच या प्रकरणात राजकीय फायद्यासाठी देशद्रोहासारख्या कायद्याचा कसा दुरुपयोग होत आहे हे यातून सिद्ध होईल. तसेच नागरिकांच्या मुलभूत प्रश्नांवरुन दुर्लक्ष करण्यासाठी कसे प्रयत्न होतात हेही यातून स्पष्ट होईल, असेही कन्हैय्या कुमार यांनी नमूद केलं.
निवडणुका आल्या की देशद्रोहाचा खटला पुढे आणला जातो, असा थेट आरोप कन्हैया कुमार यांनी केला. ते म्हणाले, “मी जेव्हा लोकसभा निवडणूक लढत होतो, तेव्हा या प्रकरणात पहिल्यांदा आरोपपत्र दाखल करण्यात आलं. आता बिहारमध्ये निवडणूक होत आहे, तर पुन्हा हा विषय चर्चेत आहे. बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार आहे. येथे भाजप सत्तेत असतानाही सरकारने एनसीआर-एनपीआर विरोधात विधानसभेत प्रस्ताव मंजूर केला.”