भोपाळ । चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष करणे मध्य प्रदेशमधील 15 तरुणांना महागात पडले आहे. पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणे, पाकच्या विजयानंतर रस्त्यावर फटाके फोडल्याप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी 15 तरुणांना अटक केली आहे. यासर्व तरुणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे सर्व तरुण 20 ते 35 वर्ष या वयोगटातील
चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल रविवारी पार पडली होती. या सामन्यात पाकिस्तानने भारतावर मात करत स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. पाकिस्तानच्या विजयानंतर जम्मू-काश्मीरमध्ये जल्लोष करण्यात आला होता. आता मध्य प्रदेशमध्येदेखील 15 मुस्लिम तरुणांनी पाकच्या विजयाचा जल्लोष केल्याचे समोर आले आहे. हे सर्व तरुण 20 ते 35 वर्ष या वयोगटातील आहेत. बुरहानपूरमधील मोहाद गावात या तरुणांनी विजयाचा जल्लोष केला. पाकच्या विजयानंतर या तरुणांनी पाकच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. तसेच फटाकेदेखील फोडले. मोहाद हे गाव मुस्लिमबहूल असून गावातील एका हिंदू ग्रामस्थाने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
सरकारी अनुदान थांबवण्याची सरकारला विनंती
‘आम्ही 15 तरुणांना अटक केली असून त्यांच्याविरोधात देशद्रोह आणि फौजदारी स्वरुपाचा कट रचणे या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. आम्ही यासंदर्भात जिल्हाधिकार्यांना पत्र पाठवणार असून या तरुणांना मिळणारे सरकारी अनुदान थांबवण्याची विनंती त्यांना करणार आहोत’ असे तपास अधिकारी रामश्रय यादव यांनी सांगितले.