सैनिकमित्र सुमेधा व योगेश चिथडे यांचा सन्मान
पुणे : स्वातंत्र्य मिळवताना स्वातंत्र्यवीरांना खूप कष्ट घ्यावे लागले होते. त्यावेळी प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची भावना होती. आजदेखील सुमेधा चिथडे आणि योगेश चिथडे यांच्यासारखी माणसे देशाचे रक्षण करणार्या सैनिकांसाठी काम करीत आहेत. त्यांच्या कामाला प्रत्येक भारतीयाने हातभार लावायला हवा. प्रत्येकाने असे काम केल्यास देशभक्तीच्या भावनेतून माणसातील सैनिक तयार होतील, असे प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी केले.
श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टतर्फे बालगंधर्व रंगमंदिर येथे नाट्यमहोत्सव 2018 चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्वमिळकतीतून सियाचीन येथे भारतीय सैनिकांसाठी ऑक्सिजनचा प्रकल्प साकारणारे सैनिकमित्र योगेश चिथडे आणि सुमेधा चिथडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. संजय पाठारे, मेघराजराजे भोसले, शैलेश टिळक, गोरक्ष धोत्रे, डॉ. राजेंद्र खेडेकर, मनिषा खेडेकर, अस्मिता मिराणी, विजय जोशी, राहुल सैंदाणे उपस्थित होते. श्रीनगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. सागर डोईफोडे, डॉ. स्वरुप सावनूर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
जात, वंश, धर्म, पंथ या गोष्टी सोडून राष्ट्राप्रती प्रेम व्यक्त करीत सैनिक काम करीत असतात. स्वत: आधी देशसेवा करणारे आपले सैन्यदल आहे. देशाच्या विविध सिमांवर सलग 48 तास उभ्या असलेल्या सैनिकांशिवाय आपण तेथे जाऊ शकत नाही, हे आपण विसरता कामा नये. जेथे सैनिकांना श्वास घेणे देखील मुश्किल आहे, तेथे काम करण्याचे आमचे स्वप्न होते. त्यामुळे देश हा देव मानून आम्ही आमचे कर्तव्य करीत सैनिकांसाठी काम करीत आहेत, असे सुमेधा चिथडे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित गोसावी तर आनंद लोंढे यांनी आभार मानले.