शिर्डी | शिर्डी संस्थानाने आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवात रविवारी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. रविवारी उत्सवाचा मुख्य दिवस होता. त्यानिमित्त श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. या निमित्ताने श्री साईबाबांच्या प्रतिमेची व पोथीची व्दारकामाई मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीत संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी पोथी, विश्वस्त ॲड.मोहन जयकर व प्रताप भोसले यांनी प्रतिमा, बिपीन कोल्हे यांनी वीणा घेवून सहभाग घेतला. तत्पूर्वी सकाळी पालकमंत्री राम शिंदे यांनी सहपत्नी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा केली. राज्याचे अदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दुपारी ह.भ.प.सौ.अंजली श्रीकृष्ण जोशी (डोंबिवली) यांचे कीर्तन झाले.
देणगीदारांना साईपादुका नाणे
गुरुपौर्णिमा उत्सवाच्या महुर्तावर संस्थानला 25 हजार किंवा त्याहून अधिक देणगी देणाऱ्या साईभक्तांना 20 ग्रॅम वजनाचे साईपादुका असलेले चांदीचे नाणे देण्याचा शुभारंभ करण्यात आला. सर्वप्रथम केनिया येथील देणगीदार साईभक्त सलिम फातिमा फराह यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते हे नाणे देण्यात आले.
सोमवारचे कार्यक्रम
समाधी मंदिरात पाद्यपुजा व गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक.
सकाळी 10.30 वाजता ह.भ.प.सौ.अंजली श्रीकृष्णा जोशी यांचे काल्याचे कीर्तन
रात्री 07.30 वाजता श्रीमती.यु.साई श्रीपदा, हैद्राबाद यांचा भजन संध्या कार्यक्रम
09.00 वाजता अवधेश चंदन भारव्दाज, लखनऊ यांचा भजन संध्या कार्यक्रम