चाळीसगाव । आम्ही बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करीत आहोत. समतेचा, स्वातंत्र्याचा, न्यायाचा संदेश देत आहोत. देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल वाढत आहे. देशात धार्मिक, सामाजिक, आर्थिक विषमता आहे. या विषमता कमी करण्याचे काम बौद्ध महासभेच्या माध्यमातून केले जात आहे. हे करीत असतांना कुठल्याही धर्मावर टिका करीत नाही. बौद्ध धम्मामध्ये चांगल्या गोष्टी, तत्वज्ञान हे लोकांसमोर बौद्ध धम्म परिषद व शिबीरांच्या माध्यमातून पोहोचवण्याचे काम आम्ही करीत आहोत अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी आज येथे दिली. ओझर ता.चाळीसगाव येथे आयोजित भव्य धम्म परिषदेसाठी त्यांचे आज शहरात आगमन झाले त्या निमित्त चाळीसगाव भारतीय बौद्ध महासभेने या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
काही राज्यांमध्ये धर्म बदलवितांना अडथळे
ते पुढे बोलतांना म्हणाले की, आज देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की विषमता प्रकर्षाने जाणवु लागली आहे. बाबासाहेबांनी सांगीतलेल्या धम्मात जे मागासवर्गीय आले नाहीत आज ते त्या धर्मात स्वतःचे स्थान कुठे आहे. अशा मागासवर्गीय समाजाने बाबासाहेब आंबेडकरांना नेते मानले आहे. अलीकडे त्यांच्यात परीवर्तन होतांना दिसत आहे. अशा धर्माच्या लोकांपर्यंत बौद्ध धम्माचे कार्य पोहोचविण्याचे काम आम्ही करीत आहोत. सध्या काही राज्यांमध्ये धर्म बदलतांना परवानग्या द्या, पुर्वकल्पना द्या असे अडथळे आणले जात आहेत. या सरकारी अडचणींवर मात करुन आम्ही धर्मांतराचे आवाहन करतो. भारतीय बौद्ध महासभा ही फक्त धार्मिक अजेंडा म्हणुन देशात काम करीत आहे. येथील अस्तित्वातील बौद्ध वास्तु त्याचे त्याचे जतन आम्ही करीत आहोत.
चार वर्षांत विषमेतत वाढ
या चार वर्षाच्या काळात धार्मिक, आर्थिक, सामाजिक विषमता वाढली मागासवर्गीयांवर हल्ले होत आहेत. अल्पसंख्यांकांनी हे करु नये ते करु नये असे निर्बंध लादले गेले आहेत. आर्थिक निर्बंध येथे लावण्यात येत आहेत. घोड्यावर बसल्यावर खुन होतो. काही ठिकाणी लग्नाची परवानगी घ्यावी लागते ही विषमता आता वाढली आहे. महाराष्ट्रात बरेच धर्मांतर झाले. जे बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीत आले नाहीत ते आज धर्मांतर करुन बौद्ध होत आहेत. चर्मकार समाज धर्मांतर करीत आहे. मागील काळात ओबीसींनी धर्मांतर केले. आज फार मोठ्या प्रमाणावर धर्मांतर होत असून ते मिडीयामध्ये येत नाही ते दाबले जाते.
अॅड.आंबेडकरांचे नेतृत्वात एकत्रिकरण
सद्यस्थितीतील राजकीय परिस्थितीबाबत बोलतांना ते म्हणाले की, विखुरलेल्या अनेक पक्ष संघटना यांचा स्वतःच्या आमदार की खासदार की वाचविण्याचा राजकीय हेतू असतो. हे सर्व जण स्वार्थामुळे कुचकामी ठरले आहेत. यामुळे यांना कंटाळून समाज आता अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातएक होत आहे. 3जानेवारीचा बंद असो वा हिंदी भाषिक पट्टीतील तीन एप्रिलचा बंद हे यशस्वी झाले आहेत.
येत्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर
अकोला वाशीम बुलढाणा या ठिकाणी भारिप बहुजन महासंघाची मोठी कार्यकर्त्यांची ताकत उभी केली आहे. यापुढे संपुर्ण राज्यात शाहू फुले आंबेडकर यांच्या विचार घेऊन वाटचाल करू स्वाभिमानाने युती होणार असल्याने गोंदिया भंडारा लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर हे उमेदवार उभे राहतील अशी माहिती त्यांनी दिली. धनगर समाज मेळावा व इव्हीएम मशीन ,मतपत्रिकेवर एकदा निवडणूक व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. आभार राष्ट्रीय संघटक डी. एस. तायडे यांनी मानले. यावेळी जिल्हाध्यक्ष के. वाय. सुरवाडे, उपाध्यक्ष सुमंगल आहिरे , समता सैनिक जिल्हा अध्यक्ष युवराज नरवाडे, जिल्हा सचिव रमेश साबळे ,ए. डी. सुरडकर , तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव , अॅड. डी. एन. पिसोळकर अॅड. कविता जाधव, प्रकाश सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळापर्यत त्यांची शोभायात्रा काढण्यात आली.