देशभरात होळीसण उत्साहात साजरा

0

मुंबई । देशभरात रंगाची उधळण करत होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. काही ठिकाणी गुरुवारपासून तर काही ठिकाणी शुक्रवारपासून रंगोत्सवाचा आनंद लुटण्यात आला. धूळवडीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात अनेक ठिकाणी धूळवड खेळली गेली. कोकणात होळीच्या सणाला विशेष महत्त्व असल्याने रत्नागिरी, सिंधुदुर्गात 8 ते 15 दिवसांचा शिमगा साजरा होत आहे. कालपासून होळीच्या सणाला सुरुवात झाली. कोकणात पारंपरिक पद्धतीने होळीचे पूजन करून होलिकादहन करण्यात आले. होळीसाठी चाकरमानीही कोकणात दाखल झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही आपल्या निवासस्थानी होळीचा आनंद लुटला.

मुंबईतही धूम
मुंबईत वरळीमध्ये काल गुरुवारी रात्री नीरव मोदीच्या प्रतीकात्मक होळीचे दहन करण्यात आले, तर औरंगाबादेत कचराप्रश्‍नावरून नारेगावच्या ग्रामस्थांनी प्रशासन आणि महापालिकेच्या नावाने शिमगा केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही कडेकोट बंदोबस्तात होळीच्या कार्यक्रमात हजेरी लावली. मराठी सिने अभिनेते भाऊ कदम यांनी ठाण्यातील अंध विग्यार्थ्यांच्या कार्यक्रमात हजेरी लावून होळीचा आनंद लुटला, तर श्रीदेवीच्या निधनामुळे हिंदी सिनेसृष्टीने या सणाकडे पाठ फिरवली.

उद्धवने द्यावी टाळी रामदास आठवले यांनी होळीनिमित्त शिवसेनेची खिल्ली उडवली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र लढण्याच्या केलेल्या वक्तव्यावर त्यांनी टीका केली. होळीबद्दल बोलत असताना ‘उद्या आहे होळी आणि उद्धव ठाकरेंनी द्यावी देवेंद्र फडणवीसांना टाळी’, असे म्हणत या दोघांनी पुन्हा एकत्र यावे असे आठवलेंनी सुचवले, तर आगामी काळात भाजपच्या काही जागा कमी होतील, असा भाजपला घरचा अहेर दिला.

होळीनिमित्त येथे रंगल्या घरांच्या भिंती
राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील सरहेटा गावातील घरांच्या भिंतीदेखील होळीच्या रंगांत रंगल्या होत्या. सकाळी उठताच हे जग रंगबेरंगी दिसावे व चांगले व सकारात्मक भाव-विचारांनी दिवसाची सुरुवात व्हावी म्हणून गावातील ग्रामस्थांनी 20 रंगांचा वापर करत प्रत्येक घराच्या भिंती रंगवून टाकल्या. या गावातील प्रत्येक घराच्या भिंती वेगवेगळ्या रंगांनी रंगवलेल्या आहेत. एवढेच नव्हे, तर एक-एक भिंत विविध रंगांनीही रंगवण्यात आली आहे. हे सर्व सरकारच्या कोणत्याही योजनेंतर्गत नाही, तर गावास रंगबेरंगी बनवण्यासाठी व गाव सकाळी चमकदार दिसावे म्हणून करण्यात आले आहे. गावातील लोकांनी मिळूनच हे सारे केले आहे.