देशभर गोहत्याबंदीसाठी सरसंघचालकांची बॅटिंग!

0

नवी दिल्ली : गोरक्षणाच्या मुद्द्यावरून संपूर्ण देशभर धार्मिक उन्माद सुरु असताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देशभर गोहत्याबंदी कायदा लागू करावा, अशी मागणी करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. गोहत्येच्या नावावर कोणतीही हिंसा नुकसानच पोहोचवते. कायद्याचे कोणत्याही परिस्थितीत पालनच झाले पाहिजे, असेही डॉ. भागवत यांनी सांगून, हिंसक गोरक्षकांना फटकारले.

हिंसाचाराने चांगल्या हेतूला गालबोट
भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात सरसंघचालक बोलत होते. ते म्हणाले, की संपूर्ण देशात आम्हाला गोहत्याबंदीचा कायदा हवा आहे. तथापि, गोहत्येच्या नावावर कोणताही हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही. त्यामुळे चांगल्या हेतूला गालबोट लागते. कायद्याचे पालन व गोवंशाची रक्षा एकाचवेळी झाली पाहिजे, अशी अपेक्षाही सरसंघचालकांनी व्यक्त केली. कथित गोभक्तांनी राजस्थानमध्ये नुकतीच एका व्यक्तीची गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर सरसंघचालकांचे वक्तव्य आल्याने आगीत आणखी तेल ओतले गेले आहे.

काँग्रेसची जोरदार टीका
सरसंघचालकांच्या विधानानंतर माजी केंद्रीय मंत्री तथा काँग्रेसनेते सचिन पायलट यांनी भाजप व संघावर जोरदार टीका केली. रोडरोमिओविरोधी पथक असो, लव जिहाद असो, किंवा कथित गोरक्षकांच्या टोळ्या असोत, त्यांच्या या उन्मादक हिंसाचारातून भाजप सरकार देशभरात आपली विचारधारा जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करत आहे. भाजप आणि संघाचा खरा एजेंडा आता सामोरे आला आहे, अशी टीकाही पायलट यांनी केली. अलवर येथे गोरक्षकांनी एका व्यक्तीची निर्घृण हत्या केली. त्याबद्दल सरसंघचालकांनी एक शब्दही उच्चारला नाही. मुख्यमंत्रीदेखील तोंडाला बूच लावून बसले आहेत, असे टीकास्त्रही पायलट यांनी डागले.

भाजपशासित राज्यांना नोटीस
अलवारमधील घटनेआधीही देशात कथित गोसंरक्षकांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. मागीलवर्षी उत्तर प्रदेशातील दादरीमध्ये जमावाने केलेल्या मारहाणीत अखलाक नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आल्यानंतर त्यावरील सुनावणीदरम्यान भाजप प्रशासित पाच राज्यांसह कर्नाटकला स्पष्टीकरण देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.