कोलकात्यात श्यामाप्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याला काळे फासले
नवी दिल्ली : त्रिपुरामध्ये रशियन क्रांतीचे जनक व्लादिमीर पुतिन आणि तामिळनाडूत पेरियार रामास्वामी यांचे पुतळे तोडण्यात आल्यानंतर देशभर महामानवांच्या पुतळ्यांची विटंबणा करण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. पुतळ्यांची तोडफोड थांबवा अन्यथा, कठोर कारवाई करावी लागेल, असा इशारा या घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधितांना दिला आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली, त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांना अॅडव्हायझरी रवाना करत, अशा घटना रोखण्याची सक्त ताकिद दिली. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीदेखील पुतळे तोडणे ही आमची संस्कृती नसल्याचे सांगत, भाजपच्या कार्यकर्त्यांना फटकारले होते. त्रिपुरात लेनिन यांचा पुतळा पाडण्यात आल्यानंतर पूर्वोत्तर राज्यांत हिंसाचार उफळला असून, डाव्या पक्षांच्या कार्यालयांची जाळपोळ केली जात आहे. तामिळनाडूतदेखील पेरियार यांच्या पुतळ्याची हातोड्याने तोडफोड करण्यात आल्यानंतर तणाव निर्माण झालेला आहे.
देशभर संतप्त वातावरण
जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या कोलकाता येथील पुतळ्याला अज्ञातांनी काळे फासल्याचा प्रकार बुधवारी निदर्शनास आला. तत्पूर्वी तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यात मंगळवारी रात्री द्रवीड आंदोलनाचे संस्थापक, थोर समाजसुधारक ई. व्ही. पेरियार रामास्वामी यांच्या पुतळ्यावर हातोड्याचे घाव घालण्याचा प्रकार घडला होता. नशेत असलेल्या दोघांनी हा प्रकार केला होता. या घटनेनंतर एका जमावाने भाजपच्या कार्यालयावर हल्लादेखील केला होता. लेनिन यांच्या पुतळा विटंबणेनंतर पूर्वोत्तर राज्यांत हिंसाचार पसरला असतानाच, मेरठ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर आंबेडकर अनुयायांनी निदर्शने सुरु केली होती. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी संतप्त जमावाला शांत करत समाजकंटकावर कारवाईचा इशारा दिला आहे. मेरठ परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या घटनांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने दखल घेत, पुतळेभंजन रोखण्याचे आवाहन केले आहे. त्यासंदर्भात त्यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चादेखील केली. गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना पाठवून, अशा घटना रोखण्याची ताकिद दिली आहे. संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. या घटनांनी देशभर संतप्त वातावरण निर्माण झाले होते.
कुणाचाही पुतळा तोडण्याचे आम्ही समर्थन करत नाही. नुकतेच घडलेले पुतळे तोडण्याचे प्रसंग अत्यंत दुर्देवी आहेत. या घृणास्पद कृत्यात कुणी भाजपचा कार्यकर्ता सामील झाला असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. अशा कार्यकर्त्याची पक्षातून हकालपट्टी झाली पाहिजे. भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृती हीच आपली खरी ओळख आहे.
– अमित शहा, भाजपचे अध्यक्ष