पुणे : राष्ट्रीय स्वंयसेवक संघात सहभागी होणार्या तरूणांमध्ये वाढ झाली असून, गेल्या वर्षभरात 1 लाख 22 हजारांपेक्षा अधिक तरूणांनी संघ शिक्षा वर्गात प्रशिक्षण घेतल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक सुरेश जाधव यांनी दिली.
संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक 19 ते 21 मार्चपर्यंत कोईम्बतूर येथे झाली. त्याची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाधव यांनी ही माहिती दिली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह विनायक थोरात, पुणे महानगर कार्यवाह महेश करपे उपस्थित होते.
संघात येणार्या तरूणांची संख्या वाढल्याने संघाच्या देशभरातील शाखांची संख्या 57 हजार 233 वर गेली आहे. त्याचप्रमाणे साप्ताहिक शाखा 14 हजार 896, तर मासिक शाखा 8226 इतक्या असल्याची माहिती जाधव यांनी दिली. पश्चिम बंगाममध्ये जिहादी तत्वांकडून होत असलेला हिंंसाचार, राज्यातील हिंदूंच्या घटत्या लोकसंखबद्दल कोईम्बतूरमधील बैठकीत गंभीर चिंता व्यक्त करणारा प्रस्ताव संमत करण्यात आल्याचेही जाधव यांनी सांगितले.
आयटीचा वाढता सहभाग
पुणे महानगरात संघकामात नागरिकांचा सहभाग वाढला असल्याचे करपे यांनी सांगितले. तसेच, सामाजिक रक्षाबंधनानिमित्त घेण्यात आलेल्या प्लॅस्टिक व ई-कचरा संकलन अभियान यशस्वीरित्या पार पडल्याचे त्यांनी सांगितले. पुणे शहरात 7 विभागांत 44 नगरांमध्ये 218 शाखा रोज भरतात. साप्ताहिक 126 शाखा भरतात. त्यातही 42 शाखांत आयटी कंपनीतील कर्मचारी सहभागी होत आहेत, अशी माहितीही करपे यांनी दिली.
निर्मलवारीचे काम संघाकडेच
गेल्या दोन वर्षांपासून निर्मल वारी अंतर्गत पुणे- पंढरपूर असे स्वच्छता अभियान यशस्वीरित्या चालविल्यामुुळे राज्य सरकाने हे काम कायमस्वरूपी संघाला दिले आहे. तसेच, यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असेही करपे यांनी सांगितले.