मुंबई : मुंबईनजीकच्या मुंब्रा येथील धाडीत नाझीम उर्फ उमेर नावाचा एक इसिस म्होरक्या पोलिसांच्या हाती लागला असून, त्याच्यासह आणखी काही जिहादींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यातील दहशतवादविरोधी पथकांनी गेल्या तीनचार दिवसांत विविध जागी धाडी घातल्या. त्यात अनेक संशयित हाती लागले असून, यापैकी काहीजण मुंबईतही धमाका करण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न होत आहे.
गेले काही महिने गुप्तचर खाते व देशाच्या अनेक राज्यांतील पोलीस पथके विविध टोळ्यांवर नजर ठेवून होती. संशयितांची माहिती मिळवत त्यांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्यात आलेले होते. त्यामध्ये मुंब्रा येथील नाझीमही सहभागी होता. त्याने ठाणे व मुंबईतील काही तरुणांना एकत्र करून एक घातपाती टोळीच बनवली होती. ही टोळी तशी नवखी व विस्कळीत होती. मात्र, त्यांना धमाका उडवून द्यायचा होता.
गेले काही महिने इसिसमुळे प्रभावित झालेल्या व विविध मार्गांनी त्याच हेतूने हिंसा करण्यास प्रवृत्त झालेल्यांचा शोध घेतला जात होता. त्यासाठी गुप्तचर खात्याने अनेक राज्यांच्या पोलीस पथकांचाही सुसूत्रपणे कामाला जुंपले होते. एका राज्यात सापडणारे धागेदोरे इतरांना देऊन वेगाने माहिती जमा केली जात होती. त्यापैकी योग्य माहिती हाती आल्यावर काही ठरावीक जागी धाडी घालण्यात आल्या. त्यात हाती लागलेल्या संशयितांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. लवककरच देशात फोफावणार्या इसिसच्या पुरस्कर्त्यांना त्यातून पायबंद घातला जाईल, अशी अपेक्षा आहे.