राष्ट्रीय कीर्तनकार गजानन महाराज धानोरेकर ; पालखीची मिरवणूक
चुंचाळे- श्री समर्थ सुखनाथ बाबा, रघुनाथ बाबा, वासुदेव बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत श्रीमद भागवत कथा संकीर्तन सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी धानोरा येथील राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.गजानन महाराज यांच्या काल्याचे कीर्तन झाले. प्रसंगी गजानन महाराज म्हणाले की, देशसेवा व आई वडीलांच्या सेवेतच खरा परमार्थ आहे. गोठ्यात गाय आणी घरात माय नसली तर घराला घर पण येत नाही. सर्वांनी आपल्या गोठ्यात गाय आणा व जे काही महाभाग आपल्या आईला सांभाळत नसतील त्यांनी आपल्या आईला घरी आणा व घराला खरे घरपण मिळवून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
गायीचा सांभाळ होत नसेल तर गो शाळेत द्या
ह.भ.प.गजानन महाराज म्हणाले की, गाय सुद्धा आपली मायच आहे माय बाप हो थोड्याफार पैशासाठी गायीला कत्तल खान्यात विकू नका जर तुमच्याकडून त्या गायीचा सांभाळ होत नसेल तर त्यांना गो शाळेत सोडून द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. विज्ञानाने जरी कितीही प्रगती केली असली तरी खरा आनंद हा आध्यात्मातून मिळू शकतो त्यासाठी प्रत्येकाने परमार्थ साधावा तसेच समाजातील गुण दोष त्यांनी आपल्या प्रबोधनपर कीर्तनातून स्पष्ट केले. हिंदू धर्माला संघटनाची नितांत गरज आहे, असे अरुण महाराज यांनी सांगितले. दरम्यांनी, दहिहंडी फोडून गोपालांनी काल्याचा आस्वाद घेतला. संध्याकाळी संपूर्ण गावात पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ह.भ.प. गजानन बळीराम महारा, मृदुंगाचार्य प्रकाश महाराज, शिवदास महाराज, गायनाचार्य हिंमत महाराज, विठोबा महाराज, प्रल्हाद महाराज व टाळकरी मंडळी उपस्थित होते.