देशांतर्गत दहशतवादाचे आव्हान

0

जागतिक तापमानवाढ, वाढता दहशतवाद यांचे आव्हान जगासमोर असताना भारतासमोर जागतिक दहशतवादाचे मोठे आव्हान निर्माण झाले असल्याचा अहवाल अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे. त्यामुळे भारताने दहशतवादावर काय कार्यवाही केली, हेही त्यातून दिसून आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे जगातील वाढत्या दहशतवादावर परदेशात जाऊन भाषणे ठोकतात. परंतु, भारतात सुरू असलेल्या दहशतवादावर व धार्मिक दहशतीवर सोयीस्कर मौन की बात करतात; असेच या अहवालातून दिसून येते. देशातील काश्मीरव्याप्त काश्मिरातील वाढता दहशतवाद थांबवणे व देशातील वाढता नक्षलवाद आटोक्यात आणणे, ही केंद्र सरकारची सध्या जबाबदारी आहे. केंद्र सरकारने देशांतर्गत व देशाबाहेरून होणारे अतिरेकी हल्ले थोपवण्यासाठी नियोजन आखले पाहिजे, तरच दहशतवाद आटोक्यात आणणे शक्य होणार आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने, जागतिक दहशतवादाचा भारत हा तीन नंबरचे लक्ष्य असल्याचा अहवाल देशात चाललेल्या घडामोडींचे निर्देशक आहे, त्यामुळे देशातील वाढता दहशतवाद व नक्षलवाद रोखण्यास केंद्र सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने तयार केलेल्या 2016च्या अहवालानुसार, इराक, अफगाणिस्तान यांच्यानंतर भारताला जागतिक दहशतवादाचा फटका बसला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 2016 साली पूर्वीच्या तुलनेत दहशतवादांच्या घटनांत 93 टक्के वाढ झाली आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या अहवालात निरीक्षण नोंदवले आहे, तर भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने हीच आकडेवारी 54.81 टक्के दिली आहे. म्हणजेच केंद्र सरकारने काश्मीरमध्ये दहशतवादाच्या घटना वाढल्याचे कदापि मान्य केले नव्हते तसेच खरी आकडेवारी देण्याचे धाडसही दाखवले नाही. यामुळे केंद्र सरकार जम्मू – काश्मीरमधील दहशतवादी घटनांची आकडेवारी नागरिकांपासून दडवून ठेवत असल्याचे दिसते, केंद्र सरकारजवळ जम्मू- काश्मीरमधील वाढत्या दहशतवादाला रोखण्यासाठी उपाययोजनाही नसल्याचे स्पष्ट दिसून येते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद व देशातील नक्षलवाद रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. आम्ही हे केले, आम्ही ते केले, अशी जाहिरातबाजी करण्याची मोदी सरकारची जी सवय आहे त्याला मोडता घालून प्रत्यक्ष कार्यवाहीकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या अहवालात, 2016 या वर्षात जगात 11,702 दहशतवादी हल्ले झाले आहेत, असे नमूद करण्यात आले आहे. यातील तब्बल 902 दहशतवादी हल्ले भारतात घडवले गेले. 2015 साली भारतात 798 हल्ले झाले आहेत. म्हणजेच दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण 2016 साली 16 टक्के वाढले आहेत. 2015 साली भारतात दहशतवादामुळे 289 जणांचा मृत्यू झाला आहे. 2016 साली हा आकडा 337 वर गेला. याचबरोबर भारतातील दहशतवादी हल्ल्यांत 2015 मध्ये 500 नागरिक जखमी झाले, तर 2016 साली हीच संख्या 636 पर्यंत गेली होती. याउलट 2015 च्या तुलनेत 2016 साली पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण 27 टक्क्यांनी कमी झाले आहे. जगातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये प्रामुख्याने इस्लामिक स्टेट (इसिस), तालिबान, बोको हराम या दहशतवादी संघटना कार्यरत आहेत. या यादीत नव्याने भारतातील माओवादी संघटनेची भर पडली आहे. कारण अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अहवालात इसिस, तालिबाननंतर दहशतवाद वाढवण्यात माओवाद्यांचा तिसरा नंबर असल्याचे नमूद केले आहे. इसिस, तालिबाननंतर भारतातील माओवादी हे सर्वातम जास्त धोकादायक असल्याचे निरीक्षण अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या अहवालातून जाहीर केले आहे. माओवादी आता जागतिक पटलाच्या रडारवर आले असल्यामुळे त्यांच्यावर केव्हाही कारवाई होऊ शकते. सर्वसामान्य आदिवासींना वेठीस धरून, सरकारी यंत्रणेला नमवून माओवाद्यांनी आतापर्यंत भयंकर उत्पात घडवला आहे. देशात 2016 साली एकूण झालेल्या दहशतवादी हल्ल्यांपैकी 336 हल्ले नक्षलवाद्यांनी घडवले आहेत.
अशोक सुतार – 8600316798