देशांतर्गत व्यापाराला चालना देण्याचा निर्णय

0

कृषी पणन मंडळाकडून परराज्यात व्यापार प्रतिनिधींची नेमणूक

पुणे : कृषी पणन मंडळाकडून देशांतर्गत व्यापाराला चालना देण्यासाठी पहिल्यांदाच परराज्यात व्यापार प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य देशात फळे, भाजीपाल्यांच्या उत्पादनासाठी अग्रेसर आहे. तसेच देशातून निर्यात होणार्‍या फळे आणि भाजीपाल्यांपैकी साधारण 60 टक्क्यांपर्यंतचा वाटा हा महाराष्ट्राचा असतो. त्यामुळे परकीय चलन मिळण्याच्या दृष्टीने निर्यात जरी महत्त्वाची असली तरी एकूण उत्पादनापैकी 10 ते 15 टक्क्यांपेक्षा अधिक शेतमाल निर्यातक्षम दर्जाचा नसतो. तसेच रासायनिक द्रव्याचा अंश, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार आणि भांडवली गुंतवणूक याबाबींमुळे सर्व उत्पादकांना त्यांचा शेतमाल निर्यात करणे शक्य होत नाही. अनेकवेळा देशातील इतर भागांमध्ये महाराष्ट्रात उत्पादीत होणारा शेतमाल पाठविला तर चांगला परतावा शेतकर्‍यांना मिळतो, असा अनुभव आहे. त्यामुळे निर्यातीबरोबरच देशांतर्गत बाजारपेठांचा शोध घेऊन तेथे राज्यातील शेतमाल पाठविल्यास शेतकर्‍यांच्या उत्पन्नात निश्‍चितच वाढ होऊ शकते, या हेतूने सहकार, पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच इतर राज्यात शेतमाल व्यापारवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने शेतमाल व्यापार प्रतिनिधी नियुक्त केले आहेत.

आठ राज्यांत 45 दिवसांसाठी नेमणूक

संबंधीत शेतमाल व्यापार प्रतिनिधी नुकतेच त्या-त्या राज्यात रुजू झाले असून तेथील कृषी पणन मंडळाच्या कार्यालयात त्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. राजस्थान आणि तामिळनाडू राज्यांतील संबंधीत अधिकार्‍यांनी या संकल्पनेचे चांगले स्वागत करून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्या राज्यातील मागणी असलेल्या शेतमालाचा अभ्यास करणे, जे शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था संबंधितांना तेथे शेतमाल पाठवू शकतील अशांना माहिती पुरविणे, तसेच त्या राज्यातील खरेदीदार, सध्याचे भाव आणि मागणी याबाबतही महाराष्ट्रातील उत्पादकांना सहाय्यभूत करणारे कामकाज या व्यापार प्रतिनिधींकडून अपेक्षित आहे. सुरुवातीस आठ राज्यांत कृषी पणन मंडळामार्फत 45 दिवसांच्या कालावधीसाठी हे व्यापार प्रतिनिधी नेमणूक करण्यात आले असून, या कालावधीतील अनुभव लक्षात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सुनील पवार
यांनी दिली.