जळगाव । विज्ञान ही एक जीवनदृष्टी असून समाजात ती रुजली तर त्यातून तंत्रज्ञानाची निर्मिती होऊन समाजामध्ये मोठी संपत्ती निर्माण होऊ शकेल. 150 गरीब देशाच्या यादीत भारताचा 140 वा क्रमांक असून स्वातंत्र्यानंतर आजही देशातील गरीब दुर झालेली नाही. आजपर्यत अनेक क्षेत्रात क्रांतीकारी संशोधन झाले परंतु देशाला खरी गरज असलेले संशोधन झाले नाही. देशाची गरज ओळखून संशोधन व्हायला हवे तरच देशाचा विकास झपाट्याने होईल असे प्रतिपादन शास्त्रज्ञ तथा मुंबईच्या रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे माजी संचालक पद्मभूषण ज्येष्ठराज जोशी यांनी केले. शनिवारी 8 रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 25 व्या पदवीप्रदान समारंभात बोलत होते. पुढे बोलतांना डॉ.जोशी म्हणाले की, आपल्या देशात विविध प्रकारच्या लाखो संधी आहेत. या संधीचा फायदा घेऊन संशोधन झाले पाहिजे. संपत्ती फक्त संशोधनातुनच निर्माण होवू शकते.विज्ञान हा फक्त शाळा, महाविद्यालयात शिकण्याचा विषय नव्हे अथवा पाठयपुस्तकातील धडे नव्हेत. आला देश केवळ तंत्रज्ञान आयात करीत आहोत. विज्ञान व तंत्रज्ञान निर्मितीमध्ये आपण मागे पडत असल्याचे त्यांनी विविध दाखले देऊन स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील होते. अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी विद्यापीठाच्या वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी विद्यापीठ सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आशुतोष पाटील व प्रा.सुरेखा पालवे यांनी केले.
राजकारणी जबाबदार नाही
देशातील आजच्या शिक्षण व्यवस्थेला दुरदृष्टी नाही. शिक्षण क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती अनेक वेळा राजकीय क्षेत्रात पदार्पण करणार नसल्याचे सांगतात परंतु देशातील शिक्षण व्यवस्थेचे राजकारण्यांनी वाटोळे केले असे म्हणणे योग्य नाही. अनेक राजकीय व्यक्तींकडे शिक्षण क्षेत्राच्या विकासाची कल्पना असते. विद्यापीठाच्या प्रगतीसाठी राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्यांची गरज असल्याची भुमिका जोशी यांनी मांडली.
79 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके
विद्यापीठ तसेच विद्यापीठ संलग्नित धुळे, नंदुरबार, जळगाव या तिन जिल्ह्यातील महाविद्यालयातील सर्वाधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांना दरवर्षी सुवर्णपदक देवून सन्मानित करण्यात येते. वर्ष 2016 मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभात सुवर्णपदक देवून गौरविण्यात आले. तीनही जिल्ह्यातील 79 विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभात मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण पदके देण्यात आली. या पदवीप्रदान समारंभात 32 हजार 161 स्नातकांना पदव्या बहाल करण्यात आल्या.
यांची होती उपस्थिती
दीक्षांत मिरवणूकीने सभामंडपात अतिथींचे आगमन झाले. विद्यापीठाचा मानदंड घेऊन मिरवणूकीच्या अग्रभागी सहायक कुलसचिव डॉ.आर.पी.पाटील होते. दीक्षांत मिरवणूकीत अतिथींसह अधिसभा सदस्य, विद्या परिषद सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य हे सहभागी होते. आमदार सुरेश भोळे, माजी आमदार शिरीष चौधरी, प्रभारी कुलसचिव प्रा. ए.बी.चौधरी, प्राचार्य डी.आर.पाटील, डी.आर.पाटील, डॉ.पी.टी.चौधरी, बी.एन.पाटील, डॉ.अरविंद जोशी, डॉ.केशव तुपे, डी.पी.नाथ, डॉ.बी.डी.कर्हाड, डॉ.डी.एन.गुजराथी उपस्थित होते.
एकापेक्षा जास्त सुवर्णपदक
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात खानदेशातील तीन जिल्ह्याचा समावेश आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना विद्यापीठाची पदवी बहाल केली जाते. यावेळी एकाच वेळी दोन, तीन सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थी देखील होते. अग्रवाल जया मांगिलाल या विद्यार्थींनीने एकाच वेळी तीन सुवर्णपदके मिळविले आहे. शेख हसीना अंबरीन कौसर बद्रे आलम, सुतार पोर्णिमा विजय या विद्यार्थीनींनी एकाच वेळी दोन सुवर्ण पदके मिळविले आहे.