या घटनेचे मोदींसोबत इतरांनाही कौतुक आहे. पण आपलेच कौतुक असे किती काळ करत बसणार, यालाही काही मर्यादा आहेत. देशात कोणताही उपक्रम वा योजना राबवली, तर ही योजना आम्ही प्रथमच राबवत असून, ती ऐतिहासिक आहे, असे ठासून सांगणारी संस्कृती आजच्या सत्ताधार्यांनी सुरू केली आहे. महाराष्ट्रात राज्य सरकारने शेतकरी आंदोलनाचा कडेलोट झाल्यानंतर कशीबशी शेतकर्यांना कर्जमाफी योजना जाहीर केली. त्यानंतर ही ऐतिहासिक कर्जमाफी आहे आणि प्रथमच जनतेला न्याय मिळत आहे, असा नगारा राज्य सरकारकडून पिटवला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा स्वच्छ भारत अभियान, वीज योजना, आरोग्य योजनांची वृत्तपत्रांत बेसुमार जाहिरात करतात, असे दिसते. राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात असल्याच्या जाहिराती वृत्तपत्रांत छापून येत आहेत. विविध वाहिन्यांवर सरकार जाहिराती करत असल्याचे दिसत आहे. ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’, ‘मी लाभार्थी’ या सततच्या जाहिरातींवर विरोधकांनी टीका केली आहे. ती टीका रास्तच आहे. जनतेचे पैसे तुम्ही जाहिरातींत वाया घालवणार असाल, तर जनतेच्या विकासासाठी पैसा कुठून आणणार, हा प्रश्न आहे.
जागतिक बँकेच्या अहवालातील व्यवसाय सुलभता निर्देशांकात भारताने केलेल्या प्रगतीचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच शनिवारी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ते दिल्लीतील प्रवासी भारतीय केंद्रात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, काही जणांना व्यवसाय सुलभता निर्देशांकात भारताने 142 व्या स्थानावरून 100 व्या स्थानापर्यंत प्रगती केली, याच्याशी देणे घेणे नाही. विरोधकांना स्वत:लाही काही करायचे नाही आणि जे करत आहेत त्यांना प्रश्न विचारायचे काम ते करत आहेत. मोदींनी पंतप्रधान झाल्यापासून परदेश वार्यांचा सपाटा लावला आहे. त्यांच्या प्रत्येक दौर्यावर देशाचा खूप पैसा खर्च होतो. त्यांच्यासोबत देशातील उच्चपदस्थ अधिकारी, मंत्री व इतरांचा चमू असतो. मोदींनी इतर काही माजी पंतप्रधानांच्या तुलनेत कमी परदेशवार्या केल्या असतील, नाही असे नाही. परंतु, कमी कालावधीत परदेश वार्या करण्यात मोदीजींचा देशातील पंतप्रधानांमध्ये पहिला नंबर लागेल, असा अंदाज आहे. मोदीप्रणीत भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून भारताचा जगात मोठा दबदबा निर्माण झाला आहे, ही मौखिक जाहिरातही भाजपा सरकारने देशात सर्वत्र केली आहे. त्यामुळे देशात विकासाचे न दिसणारे वारे वाहू लागले आहेत. मोदीजींनी सत्तेवर आल्यानंतर अनेकवेळा म्हटले आहे की, जनतेने आम्हाला अजुन कालावधी दिला पाहिजे, विकास एवढया लवकर होत नाही. त्याला वेळ द्यावा लागतो. मोदीजी खरे तेच बोलले. विकास असा कमी वेळेत होत नाही, याची जाणीव पंतप्रधान मोदींना झाली आहे. मोदीप्रणीत भाजपा सरकार देशात सत्तेवर येण्यापूर्वी देशात सर्व काही आलबेल होतेच ना? देश संकटात सापडला होता आणि मोदीजींनी येऊन तीन वर्षांत देशाला वरचे स्थान ळिवून दिले, असे तर काही झाले नाही ना? यापूर्वी जागतिक बँकेत काम केलेले देशातील माजी पंतप्रधान, जागतिक बँकेने भारताच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊनही प्रश्न उपस्थित करत असल्याचे रडगाणे मोदींनी मांडले आहे, ते योग्य नाही. ज्यांनी जागतिक बँकेत काम केले आहे, त्यांना जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता निर्देशांकात भारताने जी झेप घेतली आहे, त्यामागे काही कारण असू शकते याचा अभ्यास असू शकतो. मोदीजी म्हणतात की, माझ्याकडे दुसरे तरी काय आहे? माझा देश, येथील सव्वाशे कोटी जनतेच्या जीवनात बदल घडवून आणणे हेच माझे एकमेव ध्येय आहे. जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता निर्देशांकात भारताने जी झेप घेतली आहे, ती कामगिरी यापूर्वीच करता येणे शक्य होते. भारताची आजची परिस्थिती अजून चांगली झाली असती. यापूर्वी दिवाळखोरी आणि बुडीत कर्जासंबंधी नियमांमध्ये योग्य सुधारणा झाली असती, तर हे भाग्य तुमच्या वाट्याला आले नसते का?, असा सवालही मोदीजींनी विरोधकांना विचारला आहे. दरवेळी विरोधकांनी पूर्वी सत्तेवर असताना केलेल्या चुका उगाळणे पंतप्रधानांना शोभत नाही. विरोधकांना नावे ठेवून तुम्ही कर्तव्यापासून परावृत होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रामाणिकपणे काम करून दाखवावे लागेल. विकासकामे कशी करणार, जाहिरातीतून प्रसिद्धी करून की प्रत्यक्ष कृतीतून, हेच महत्त्वाचे आहे.
जागतिकीकरणाचे धोरण भारताने 1991 साली स्वीकारले असून युरोपातील देशांनी, ज्यांनी जागतिकीकरणाची प्रक्रिया इतर देशांत राबवली त्या देशांनी भारतासारख्या विकसनशील देशांत बाजारपेठा शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने अशा विकसनशील देशांनी गरीब देशांचे कौतुक करण्याचे मतलबी धोरण सुरू केले आहे. जागतिक नामांकन यादीत आपला 100 वा नंबर आला, तरी ते देश आपल्या देशाचे कौतुक करत आहेत, याचे कुणाला वाईट वाटत नाही हे विशेष आहे. जागतिकीकरण प्रक्रियेत श्रीमंत व पुढारलेले देश गरीब देशांना सहानुभूती दाखवल्यासारखे करून त्यांच्याकडून आपला काही फायदा होतो का, याची चाचपणी करत असतात. तो त्यांच्या व्यावसायिकतेचा अविभाज्य भाग आहे, हे जगातील विकसनशील व गरीब राष्ट्रांनी लक्षात ठेवण्याची गरज आहे. यासाठी थोड्या कौतुकाने हुरळून जाण्याची गरज नाही.
– अमोल देशपांडे
वृत्त समन्वयक, जनशक्ति, मुंबई
9987967102