गल्ली ते दिल्ली फेकू सरकार -माजी खासदार उल्हास पाटलांचा टोला : 40 वर्ष पक्षाला देणार्या माजी मंत्री खडसेंना न्याय न देणारी भाजपा सर्वसामान्यांना काय न्याय देणार!
फैजपूर- देशाची वाट लावणार्या भाजपा सरकारला आता खाली खेचण्याची वेळ आली असून ‘अभी नहीं तो कभी नही’, असे म्हणत काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी येथील पावण भूमीत आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकत कार्यकर्त्यांसह पदाधिकार्यांमध्ये उत्साह भरला. फैजपूर येथे काँग्रेसचे 1936 मध्ये माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय अधिवेशन घेतल्यानंतर निर्णायक स्वातंत्र्य लढ्याची हाक देण्यात आली होती व त्याचे पडसाद 1942 च्या आंदोलनात संपूर्ण देशात दिसून आल्याने दुसर्या टप्प्यातील संघर्ष यात्रेचे सुरुवात काँग्रेसने फैजपूरच्या भूमीतून केली. मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याने आगामी निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांच्या हाती एकहाती सत्ता द्या, असे आवाहन सर्वच मान्यवरांनी केले. गल्ली ते दिल्ली फेकू सरकारचे राज्य असल्याची कोपरखळी माजी खासदार उल्हास पाटील यांनी मारल्याने टाळ्यांचा कडकडाट झाला तर रावेर लोकसभेची जागा काँग्रेसला सोडण्याची त्यांनी मागणी केल्यानंतर उपस्थितांनी त्यांचे समर्थन केले. 40 वर्ष पक्षासाठी झिजवणार्या माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांना भाजपा पक्ष न्याय देवू शकला नाही त्यामुळे हा पक्ष सर्वसामान्यांना काय न्याय देणार ? असा प्रश्नही मान्यवरांनी उपस्थित केला. दरम्यान, गुरुवारी दुपारी एक वाजता छत्री चौक ते धनाजी नाना महाविद्यालय पर्यंत जनसंघर्ष यात्रा काढण्यात आल्याने जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गल्ली ते दिल्ली फेकू सरकार -माजी खासदार पाटील
माजी खासदार डॉ.उल्हास पाटील म्हणाले की, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत फेकू सरकार आहे. हे सरकार जनतेचे नाही तर हे सरकार खिसेभरूंचे आहे तसेच रावेर लोकसभेची जागा ही काँग्रेससाठी सोडल्यास नक्कीच आगामी 2019 च्या निवडणुकीत जिंकुन येईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. वरीष्ठ पदाधिकार्यांनी याबाबत लक्ष घालून रावेर लोकसभेची जागा काँग्रेसकडे आणावी यासाठी वकीली करायला हवी, असेही ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पाटील यांच्या हा भाषणाचा धागा पकडत तुमच्यासाठी आम्ही वकीली करू, असा शब्दही भाषणातून देत अप्रत्यक्षपणे रावेरची जागा काँगे्रसला सोडण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाहीदेखील दिली.
यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
खासदार हुसेन दलवाई, भालचंद्र मुणगेकर, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार भाई जगताप, शरद रणपिसे, नसीम खान, सत्यजीत तांबे यांची व्यासपीठावर तर कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल अध्यक्ष विलास औताडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल सरचिटणीस मनीष नेमाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल उपाध्यक्ष व जळगाव जिल्हा सेवादल समन्वयक गजानन लांडे पाटील, फैजपूर उपनगराध्यक्ष कलीम मण्यार, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, माजी नगरसेवक चेतन किरंगे, शहराध्यक्ष कौसर अली, चंद्रशेखर चौधरी, रीयाज मेंबर, पंचायत समितीचे माजी सभापती लिलाधर चौधरी, विलास तायडे, तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे आदींची उपस्थिती होती.