देशाची सेवा करण्यासाठी इमानदार अधिकारी बनण्याची आवश्यकता

0

भुसावळ। युपीएससी आणि एमपीएससी परिक्षेची तयारी केली तर भारताचा चांगला नागरीक घडू शकतो. सर्वांचा मेंदू सारखाच असतो परंतु जे मेंदुचा उपयोग करणे जाणतात तेच परिक्षा उत्तीर्ण होतात आणि अधिकारी बनतात. पण यापैकी काही अधिकारी आपल्या क्षेत्रात नाव कमावतात कारण ते देशासाठी प्रामाणिकपणे काम करतात म्हणून देशाची सेवा करण्यासाठी इमानदार अधिकारी बना, असे मार्मिक उद्गार सहाय्यक पोलीस अधिक्षक निलोत्पल यांनी काढले. येथील शांतीनगर परिसरात असलेल्या नॉलेज सेंटर स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी आयोजित शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

यावेेळी ते म्हणाले की, आपण भाग्यावर विश्‍वास न ठेवता कठोर परिश्रम करावे. भाग्य तेव्हाच साथ देते तेव्हा 90 टक्के आपण मेहनत करतो. भारतात युपीएससी परिक्षेपेक्षा दुसरी चांगली परिक्षा नाही. या परिक्षेची तयारी करतांना एनसीईआरटीचे पुस्तक आणि दैनिक वर्तमान पत्र वाचणे आवश्यक आहे. या परिक्षेची तयारी करतांना तपस्या आणि सातत्य असणे आवश्यक आहे. कोणतेही काम हे आपली जबाबदारी समजून केल्यास यश नक्कीच मिळते. आई, वडिलांना तुमचा गर्व वाटला पाहिजे, असे कार्य करा तसेच विविध स्पर्धात्मक परिक्षेच्या तयारीसाठी नॉलेज सेंटरतर्फे चालविल्या जाणार्‍या उपक्रमांची त्यांनी स्तुती केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नॉलेज सेंटरचे मार्गदर्शक डॉ. दिगंबर खोब्रागडे यांनी केले. सुत्रसंचालन मुख्याध्यापक जनार्दन जाधव यांनी केले. तर आभार संचालिका वंशिता यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रा. जतिन मेढे, समाधान जाधव, कैलास तायडे, भिमज्योत शेजवळ, राणी कोळी, दिपक कोळी, मयुर मेघे, नितीन भालेराव, सुवर्णा अडकमोल, आकाश सुरवाडे, गणेश अहिरे यांनी परिश्रम घेतले.