देशाचे किती तुकडे करणार?

0

श्रीनगर : पाकिस्तानकडेही अणुबॉम्ब आहे. आम्ही त्यांच्या हातून मरावे, असे तुम्हाला वाटते का? तुम्ही तर महालांमध्ये बसला आहात. सीमाभागात राहणार्‍या गरिबांचा विचार करा. एका पाकिस्तानची निर्मिती तर आधीच केली आहे. आता देशाचे आणखी किती तुकडे करणार आहात, असा सवाल जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केला. पाकव्याप्त काश्मीर (पीओके) पाकिस्तानचाच भाग असून, त्यांनी हातात बांगड्या भरल्या नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केले. श्रीनगर येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

देशाचे आणखी किती तुकडे करणार
पीओके हा पाकिस्तानचा भाग असून, तो कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही, असे विधान अब्दुल्ला यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. यावरून त्यांच्यावर टीका झाली होती. त्यावर पीओके परत मिळवू, असे केंद्रीय मंत्री हंसराज अहिर म्हणाले होते. अहिर यांच्या या विधानावरून अब्दुल्ला यांनी शनिवारी श्रीनगरमधील जाहीर सभेत भाजपवर निशाणा साधला आहे. पीओके पाकिस्तानचाच भाग आहे. त्यांनी हातात बांगड्या भरल्या नाहीत. भाजपने आधीच पाकिस्तानची निर्मिती केली आहे. देशाचे आणखी किती तुकडे करायचे आहेत, असा सवालही त्यांनी केला. उत्तर प्रदेशात भाजप नेते मुस्लिमांना धमकावत आहेत. हिंदुस्तान तुमच्या बापाचा नाही. तुम्ही जबरदस्तीने मते मागू शकत नाहीत, असे अब्दुल्ला म्हणाले.