नोटाबंदीच्या निर्णयानंतर 50 दिवसांचा अवधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितला होता. या 50 दिवसांत सर्वकाही सुरळीत झाले नाही तर मला कोणत्याही चौकात शिक्षा द्या, असेही मोदी म्हणाले होते. आता 50 दिवस भरले आहेत. देशातील परिस्थिती अद्यापही सुरळीत झालेली नाही. तेव्हा मोदी देशातील कोणत्या चौकात शिक्षा भोगायला तयार आहात? नोटाबंदीमुळे या देशाचे काहीही भले झालेले नाही. झाले ते वाटोळेच!
नोटाबंदीच्या घोषणेपर्यंत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात 15.44 लाख कोटी रुपये चलनात होते. एकूण चलन आकाराच्या 86 टक्के एवढी ही रक्कम होती. नोटाबंदीनंतर यापैकी 14 लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम पुन्हा बँकांत जमा झाली आहे. ही रक्कम केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने अपेक्षित धरल्यापेक्षा जरा जास्तच आहे. मोदी सरकारला वाटले होते की, किमान 3 लाख कोटी रुपयांचे चलन पुन्हा बँकांत येणार नाही. परंतु, अत्यंत धूर्त धनाढ्यांनी व काळापैसेवाल्यांनी आपल्याकडील काळा पैसा पांढराच केला नाही तर तो पुन्हा नव्या चलनाच्या स्वरुपात प्राप्तही केला. दररोज कुठे ना कुठे नोटा जप्त होत आहेत. या नोटांचे पुढे काय होते, तेही कळत नाही! तर दुसरीकडे आजदेखील बँका आणि एटीएमच्या बाहेर नागरिकांच्या भल्यामोठ्या रांगा लागलेल्या आहेत. 2 हजार रुपये काढायचे म्हटले तरी त्यांना तासन्तास रांगांत उभे रहावे लागते. दुसरीकडे, धनाढ्य लोकांनी काळ्याचा पांढरा केलेला पैसा त्यांच्या तिजोरीत सुरक्षितपणे जमाही झाला आहे. त्यामुळे प्रश्न असा पडतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय देशवासीयांच्या माथी मारून, त्यांचा गेल्या 50 दिवसांपासून अतोनात छळ करून नेमके काय साध्य केले? मोदींना काळा पैसा तर हुडकून काढता आलाच नाही. परंतु, देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे तोडण्याचे काम केले. नोटाबंदीमुळे शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, बेरोजगार यांच्यावर मोठी कुर्हाड कोसळली. शेतमालाचे भाव कोसळले, अनेक बेरोजगार झालेत, या पापाचे धनी मोदी नाही तर मग कोण आहे? जी माणसे नोटांसाठी रांगेत मृत्युमुखी पडलीत त्यांच्या कुटुंबीयांना तर मोदींनी वार्यावर सोडलेले दिसते. मोदींमुळेच या माणसांचे जीव गेले त्यांना अद्याप नुकसान भरपाई का दिली गेली नाही? आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रतिष्ठादेखील एका क्षणात धुळीस मिळाली. या देशासाठी मोदी अद्याप चांगले काही तर करू शकले नाहीत. त्यामुळे मोदींना देशद्रोही का म्हणू नये? नोटाबंदीमुळे दहशतवाद, ड्रग्ज माफिया, मानवतस्करी, बनावट नोटा या अनैतिक प्रकारांना आळा बसल्याचा दावा मोदी करीत आहेत. हा अत्यंत फालतू दावा असून, कोणत्या आधारावर मोदी अशा प्रकारचा दावा करीत आहेत, तेच कळत नाही. बनावट नोटा सापडत आहेत, दहशतवादी रक्तपात घडवतच आहेत, या गैरप्रकारांना आळा बसला तरी कुठे? नोटाबंदीनंतर गुन्हेगारी घटली असेही नाही. या देशात मोदी म्हणतात तसे काहीही झाले नसून, नोटाबंदीमुळे पूर्वी ज्या समस्या होत्या त्या तशाच आहेत. उलटपक्षी नवीन समस्या निर्माण करून ठेवल्या आहेत. नोटाबंद केल्यामुळे दहशतवाद, गुन्हेगारी, ड्रग्ज अन् मानवीतस्करी थांबली असती तर जगातील कोणत्याही देशाने नोटा छापल्याच नसत्या. नोटांचे अस्तित्वच निर्माण न करून जगात शांतता नांदली गेली असती. परंतु, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. त्यात मोदींसारख्या हुकूमशहाला अक्कल शिकवणार तरी कोण? आम्हाला तर मोदींचे व्यक्तिमत्त्व निर्मम हुकूमशहा मुसोलिनी, अॅडॉल्फ हिटलर, कर्नल गद्दाफी आणि फ्रान्सची महारानी मेरी अॅण्टोइनेट्टो यांच्यासारखेच भासते आहे. या हुकूमशहांनी ज्या प्रकारे त्यांच्या देशात राजकीय वाटचाल केली आणि सत्तेच्या माध्यमातून त्या देशांचे वाटोळे केले, त्याच रस्त्यावरून मोदी जात आहेत. मोदींच्या नेतृत्वातील भाजपच्या सरकारला पाशवी बहुमत देणे हीच या देशातील प्रत्येकाची मोठी घोडचूक ठरली आहे. नोटाबंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांना अद्याप तरी काही फायदा झाला नाही. मात्र, मोदी यांच्या उद्योगपती मित्रांनी आपला फायदा करून घेतला आहे. या मित्रांचे 7 हजार कोटीपेक्षा जास्त रकमेचे कर्ज मोदींनी माफ करून आपल्या या मित्रांना नोटाबंदीचा सर्वांत पहिला लाभ मिळवून दिला. त्यात विजय मल्ल्या या पळपुट्या कर्जबुडव्याचाही समावेश आहे. अशाप्रकारचे अविचारी निर्णय यापूर्वी मुसोलिनी, हिटलर, गद्दाफी यांनीही त्यांच्या सत्ताकाळात घेतले होते. त्याच धर्तीवर उद्योगपतीधार्जिणे निर्णय घेण्यात मोदींचा चौथा क्रमांक आता लागेल. वास्तविक पाहाता, मोदी ज्या खुर्चीवर बसत आहेत, त्या खुर्चीवर यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री, इंदिरा गांधी, पी. व्ही. नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे ख्यातकीर्त नेते बसलेले आहेत. त्यांच्या कार्यकाळात पंतप्रधानपदाला एक सन्मान, एक उंची होती. ती उंची आता मोदींना त्या खुर्चीवर बसलेले पाहून कुणाला दिसत नाही. मोदी यांनी नोटाबंदीचा अविचारी निर्णय घेऊन केवळ अर्थव्यवस्थेचाच अपमान केला नाही तर पंतप्रधानपदाच्या खुर्चीचाही घोर अपमान केला आहे. मोदी यांच्या निर्णयाने फ्रान्सची महाराणी मेरी अॅण्टोइनेट्टे हिची आठवण जागी होत आहे. ही महाराणी म्हणाली होती, लोकांना खायाला अन्न नसेल तर त्यांनी केक खावा. मोदी हे आता आधुनिक अॅण्टोइनेट्टे ठरलेले आहेत. जे म्हणत आहेत की, तुमच्याकडे कागदाच्या नोटा नसतील तर प्लॅस्टिक (डेबिट कार्ड/ क्रेडिट कार्ड) वापरा. नोटाबंदीचे संकट हे हाताने ओढावून घेतलेले संकट आहे. त्याचा परिणाम प्रत्येकाच्या जीवनावर झालेला आहे. 50 दिवसानंतर सर्वकाही ठीकठाक झाले नाही तर जनता देईल ती शिक्षा भोगण्यास तयार असल्याचेही मोदी म्हणाले होते. आता मोदींनी त्यांच्या शब्दाला प्रामाणिक रहावे. जनतेने तुम्हाला काही शिक्षा द्यावी, अशी यंत्रणा तूर्त तरी अस्तित्वात नाही. त्यामुळेच तुम्ही स्वतःच प्रायश्चित्त घ्या. देशातील कोणत्याही चौकात तुम्हीच स्वतः स्वतःला दंडीत करून घ्या!