देशाचे भविष्य दारुच्या नशेत !

0

देशभरातील 10 ते 17 वयोगटातील सुमारे 40 लाख मुले अंमली पदार्थांचे सेवन करतात, तर 30 लाख मुलांना दारूचे व्यसन जडले आहे, अशी धक्कादायक माहिती सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रतनलाल कटारिया यांनी लोकसभेत दिली. 2018 च्या राष्ट्रीय सर्वेक्षणातील माहितीनुसार, या वयोगटातील सुमारे 30 लाख मुले व्यसनासाठी ‘इनहेलर’चा वापर करतात. 20 लाख मुले भांग आणि वेदनाशामक औषधांचे व्यसन करतात, तर चार लाख मुले अ‍ॅम्फेटामाइन-टाइप स्टिम्युलन्ट (एटीएस) म्हणजेच विशिष्ट प्रकारची उत्तेजके वापरतात आणि दोन लाख मुले कोकेन आणि ग्लानी आणणारी औषधे घेतात. कोणतेही व्यसन शरीराला घातकच असते. त्यापासून अनेक आजार उद्भवतात. तरीही देशात व्यसन करणार्‍यांच्या प्रमाणात मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे त्यामुळे मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्यांही वाढत आहे.

भारतात दारुबंदीची चर्चा सातत्याने रंगत असल्याने सरकार दारुबंदी किंवा याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करते मात्र त्याचवेळी या दारुमुळेच सरकारला मोठ्याप्रमाणात महसूल मिळत असल्याचा विरोधाभास दिसून येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार भारताची लोकसंख्या जेव्हा 115.17 कोटी होती, तेव्हा 67 टक्के प्रौढ व्यक्ती 2.6 लिटर निव्वळ अल्कोहोल घेत होते. केरळ हे भारतातील सर्वाधिक साक्षरता असलेल्या राज्यात तर हे प्रमाण 8 लिटरपेक्षा जास्त आहे. उच्च-मध्यमवर्ग; नव्याने श्रीमंत होऊ घातलेला वर्ग आणि आदिवासी-कातकरी समाजात याचे प्रमाण जास्त आढळते. सध्याची परिस्थिती पाहता भारतात दारूची बाजारपेठ 8.8 टक्क्यांच्या सीएजीआरने वाढत आहे आणि सन 2022पर्यंत ते 16.8 अब्ज लिटरपर्यंत पोचतील अशी शक्यता आहे.

ऑर्गनायझेशन फॉर इकोनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट या जागतिक संस्थेच्या मद्यप्राशनासंबंधीचा अहवालानुसार, पूर्वी साधारणपणे 30 ते 35 वर्षांपासून सुरू होणारा मद्यपींचा वयोगट आता 22 ते 23 वर्षांपर्यंत खाली उतरला असून वीस वर्षांच्या खालच्या मुलांमध्येही मद्यप्राशनाचे व्यसन बघायला मिळत आहे. दारूला समाजात प्रतिष्ठा दिली जाऊ लागली आहे, तसेच दारू सहजगत्या उपलब्ध होते हे मद्यपी रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याण्याचे महत्त्वाचे सामाजिक कारण आहे. सद्य:परिस्थितीत तरुण पिढीसोबतच 12 ते 18 वयोगटांतील किशोरवयीन मुलांमध्ये मद्यपानाचे प्रमाण वाढत आहे. बीअर ही दारू नसून ती प्यायली की वजन वाढते, भीती वाटत नाही, ताण कमी होतो यांसारख्या दंतकथा पौगंडावस्थेतील मुलांमध्ये दारूबाबत गैरसमज पसरविण्यास कारणीभूत आहेत. लहान वयात मौजमस्ती म्हणून घेतलेल्या बीअरपासून सुरू झालेला प्रवास रम, व्होडका, व्हिस्की किंवा कधी कधी देशी दारूपर्यंत कधी पोहोचतो हे त्या मुलांनाही कळत नाही. मानसशास्त्रीय अभ्यासानुसार अल्पवयात दारू पिणार्‍या मुलांमध्ये मोठेपणी व्यसनाधीन होण्याची शक्यता 15 टक्के असते. त्यामुळे मुलांमधील मद्यपानाचे वाढते प्रमाण हे भावी पिढीसाठी धोक्याची घंटा आहे. तरुण वयोगटातील मुले ही चित्रपट किंवा चित्रपटातले नायक पाहूनही दारू पिण्यासाठी उत्तेजित होतात. नायक-खलनायक हे या किशोरवयीन मुलांचे ‘आयडॉल्स’ आहेत. त्यामुळे हातात दारूचा ग्लास आणि ओठावर सिगरेट अशा त्यांच्या ‘मॉर्डन लाइफस्टाइल’चे ही मुले अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. मध्यंतरी कबीरसिंग नावाचा एक चित्रपट आला होता. यातील नायक दारु पिऊन कशाप्रकारे हाणामारी करतो, याचे अनुकरण केल्याने अनेकांना तुरुंगाची हवा खावी लागली होती.

जागतिक आरोग्य संघटनेनच्या एका अहवालानुसार, जगभरात दरवर्षी दारूमुळे 33 लाख लोक मरण पावतात, दर 10 सेकंदाला एक मृत्यू होतो. हे प्रमाण एड्स, हिंसाचार आणि रस्ते अपघातात होणार्‍या मृत्यूपेक्षाही जास्त आहे. अल्कोहोल अँड हेल्थविषयी युनायटेड नेशन्सच्या आरोग्य संस्थेच्या अहवालात म्हटले आहे की, जगभरात 20 पैकी एक मृत्यू दारूमुळे होतो. भारतात दरवर्षी दारुमुळे 2.6 लाख लोकांचा मृत्यू होतो. यात प्रामुख्याने दारु पिल्यानंतर ड्रायव्हिंग करताना होणार्‍या अपघातांसह यकृत समस्या, कर्करोग आदी प्रमुख कारणे आहेत. दारुमुळे यकृतावर वाईट परिणाम होतो. हळूहळू यकृत आकुंचन पावते. पेशी काम करेनाशा होतात. या स्थितीला लिव्हर सिरोसिर म्हणतात. मद्याच्या अधिक सेवनामुळे मृत्यूही ओढवू शकतो. स्टडीज ऑन अल्कोहोल अ‍ॅपण्ड ड्रग्जच्या सर्वेक्षणानुसार कमी वयात दारूचे व्यसन लागल्यास ती सोडल्यावर त्याचे परिणाम दीर्घ वयापर्यंत दिसून येतात. त्यामुळे वय वाढल्यावर अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. वेस्टर्न अफेअर्स हेल्थ केअर सिस्टिमच्या संशोधकांच्या मते दारू सेवनाने मेंदूच्या काही भागावर दुष्परिणाम होतो. दारू पिण्याचे समाधान, सतत दारूचा विचार, दारू न मिळाल्यावर अस्वस्थता, दारू पिण्यात वा ती मिळविण्यासाठी भरपूर वेळ घालवणे व दारूच्या अमलात राहणे तसेच इतर जबाबदार्‍यांकडे दुर्लक्ष करणे, याला अल्कोहोल डिपेन्डन्सी म्हणतात. तरुणांमध्ये याचे प्रमाण वाढत आहे. दारू पिऊन गाडी चालविल्यामुळे होणारे असे अपघात तरुणांचे जीवन एका क्षणात बदलवू शकतात. कधी कधी अशा अपघातामंध्ये मुलांना अपंगत्वही येते. दारू हा एका विशिष्ट वर्गाला जडलेला आजार नसून समाजरूपी वृक्षाला पोखरत चाललेली कीड आहे. किशोरवयातील मुलांमध्ये वाढत चाललेली ही व्यसन व्याधी थांबविणे गरजेचे आहे. त्याचबरोबरीने या व्याधीचे बळी पडलेल्या कोवळ्या जीवांना पुन्हा नव्याने जगण्याची ऊर्मी देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

व्यसन हे व्यसनच, मग ते कुठलेही असो, घातकच असते. रोग झाल्यावर इलाज करण्यापेक्षा रोगच होणार नाही, याबाबत दक्षता घेणे केव्हाही चांगले नाही का? याकडे शासनानेच लक्ष देण्याची आवश्यकता आहे. एकीकडे दारुबंदीचे धोरण आखायचे व दुसरीकडे दारुचे कारखाने, दुकाने, परमिट रुम-बियरबार सुरु करण्यासाठी मुक्तहस्ताने परवानगी द्यायची, अशी दुटप्पी भुमिका सोडणे आवश्यक आहे. व्यसनाधीनतेचे प्रमाण घटविण्यासाठी ‘एनएपीडीडीआर’ हा राष्ट्रीय कृती आराखड्याची अंमलबजावणी केली जात आहे. हा आराखडा 2018-2025 या कालावधीसाठी असून विविध स्तरांतून राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी जागृतीपर कार्यक्रम राबविणे, पालकांसह सेमिनार आयोजित करणे, किशोरवयीन मुले आणि तरुणांसाठी संवादात्मक कार्यक्रम, उपचार सुविधा इत्यादी उपययोजना करण्यात येत आहेत, मात्र याकडे केवळ शासकीय उपक्रम म्हणून न पाहता, उद्याच्या पिढीला बरबाद होण्यापासून रोखण्यासाठी केलेले कर्तव्य म्हणून पाहिले पाहिजे. तरच यात यश मिळेल!