नवी दिल्ली | राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 10 वाजता भारताचे 13 वे उपराष्ट्रपती म्हणून व्यंकय्या नायडू यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रपती भवनातील या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.
आंध्र प्रदेशातून यापूर्वी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि व्हीव्ही गिरी यांनी हे पद भूषवले आहे. मात्र, नायडू हे हिंदीतून शपथ घेणारे दक्षिणेतील पहिले उपराष्ट्रपती ठरले. पदाची शपथ घेण्यापूर्वी नायडूंनी सकाळी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर दीनदयाळ उपाध्याय आणि सरदार पटेलांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली.
मोदींनी राज्यसभेत केले स्वागत
राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांच्या स्वागतप्रसंगी राज्यसभेच्या सदस्यांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. यावेळी स्वागतपर भाषणात पंतप्रधान म्हणाले की, आजच्या 11 ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्य चळवळीतील तरुण क्रांतिकारक खुदीराम बोस यांना ब्रिटीशांनी फासावर चढवले. ही घटना स्वातंत्र्यासाठी लढलेल्यांच्या बलिदानाची तसेच जबाबदारीचे स्मरण करुन देते. वेंकय्या नायडू हे स्वतंत्र भारतात जन्मलेले पहिले उपराष्ट्रपती आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. नायडू यांना प्रदीर्घ अनुभव असून संसदीय कामकाजाच्या गुंतागुंतीची त्यांना उत्तम जाण आहे. ग्रामीण भाग, गरीब आणि शेतकरी यांच्या गरजांप्रति नायडू हे नेहमीच संवदेनशील असतात आणि त्यांच्या समस्यांबाबत नायडू यांनी दिलेली माहिती अतिशय उपयुक्त असते. विनयशील आणि ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती आज देशाच्या सर्वोच्च पदांवर विराजमान असून यातून भारतीय लोकशाहीची परिपक्वता आणि भारतीय संविधानाचे सामर्थ्य दिसून येते, असे पंतप्रधान म्हणाले.