सुरेश गोरे : संकल्प से सिध्दी : नवभारत का मंथन अभियान
राजगुरुनगर । देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक तरुणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यापासून प्रेरणा घेऊन तरूणांनी देशाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजवावी, असे आवाहन आमदार सुरेश गोरे यांनी केले.
ते हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या वतीने आयोजित संकल्प से सिध्दी : नवभारत का मंथन अभियान याच्या समारोपाप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील यांनी भूषविले. नानासाहेब टाकळकर, तहसीलदार सुनील जोशी, मिलिंद भिंगारे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, संचालक बाळासाहेब सांडभोर, अॅड. माणिक पाटोळे, उमेश आगरकर, माधव जायभाय, डॉ. मेजर सिंग, डॉ. एस. बी. पाटील, डॉ. एच. एम. जरे, प्रा. व्ही. डी. कुलकर्णी, डॉ. संजय शिंदे, प्रा. जी. जी. गायकवाड, कैलास पाचारणे आदी मान्यवरांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते.
विविध स्पर्धा संपन्न
संकल्प ते सिध्दी या अभियानात सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन करताना विविध विषयांवर मंथनाबरोबरच निर्मितीची गरज असल्याचे प्रतिपादन अॅड. देवेंद्र बुट्टे पाटील यांनी केले. या अभियानांतर्गत रांगोळी, चित्रकला, निबंध आणि मुलामुलींच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यातील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व फोल्डर भेट देऊन गौरविण्यात आले. प्रा. रवी चौधरी यांनी ’मी राजगुरु बोलतोय’ या विषयावर तर अनिकेत आरुडे याने ’मी भारत बोलतोय’ या विषयावर एकपात्री नाटकाचे सादरीकरण केले.
विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार
भारत सरकारच्या गीत व नाटक विभागाच्या वतीने शाहीर बापू पवार, मीरा दळवी व सहकार्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. तर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने देशभक्तीपर गीतगायन व नृत्याविष्कार सादर करण्यात आला. याप्रसंगी नये भारत का संकल्प प्रतिज्ञेचे वाचन डॉ. संजय शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव जायभाय, सूत्रसंचालन डॉ. संजय शिंदे यांनी तर आभार प्रा. मच्छिंद्र मुळुक यांनी मानले.