भारतरत्न जे. आर. डी. टाटा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध उद्योग पुरस्कारांचे वितरण
पिंपरी-चिंचवड : ‘कामगारांच्या श्रमातूनच हा देश उभा राहिला असून देशाच्या प्रगतीत कामगारांचा मोठा वाटा आहे. जे. आर. डी. टाटा यांनी मोठी परंपरा देशाला मिळवून दिली आहे. मला त्यांचा फार अल्प सहवास लाभला. त्या अल्प सहवासात मला खूप गोष्टी शिकता आल्या. त्यांच्याकडून मिळालेल्या शिक्षणात मी धन्यता मानतो’, असे मत ज्येष्ठ व्यवस्थापनशास्त्र तज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी व्यक्त केले.
भारतरत्न जे. आर. डी. टाटा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र राज्य औद्योगिक परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित विविध उद्योग पुरस्कारांचे वितरण डॉ. शेजवलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपमहापौर शैलजा मोरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून टाटा मोटर्सचे मनोहर पारळकर उपस्थित होते.
विविध पुरस्कार प्रदान
उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यावसायिकांना उद्योग पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी भोसरी येथील प्लॅनेट टूल्सचे संचालक श्रीराम हंडीबाग यांना ‘उद्योग रत्न’, तळवडे येथील आर्या इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक फल्ले यांना ‘उद्योग विभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रजापती फाउंड्री पिंपरीचे राजेश प्रजापती यांना ‘उद्योग भूषण’, हेवी प्रिसीजन प्रा.लि. भोसरीचे संचालक दिनेश शहाकार यांना ‘उद्योग भूषण’,एस्क्वॉयर एच आर सोल्यूशन प्रा. लि.चे संचालक अजिनाथ देवकर यांना ‘उद्योग मित्र’, अॅनॉलॉजिक ऑटोमेशन प्रा. लि. पुणेच्या संचालक अनुजा कल्याणकर यांना ‘उद्योग सखी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या गुणवंत कामगार पुरस्कारासाठी दत्तात्रय येळवंडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
रत्ने शोधून कोंदण देण्याचे काम
शेजवलकर म्हणाले, ‘कोणताच माणूस वाईट नसतो, प्रत्येकात वेगळेपण असते. त्याच्यावर विश्वास ठेवणे गरजेचे असते. हाच विश्वास जे. आर. डी. टाटा यांनी कामगारांवर ठेवला. त्यांच्याकडून ब-याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या शिक्षणात मला धन्यता वाटते’. पारळकर म्हणाले, ‘रत्न खूप असतात, त्यांना शोधावं लागतं. नुसतं शोधून भागणार नाही, तर त्याला कोंदणही द्यावं लागतं. हे काम आज या पुरस्कार वितरण सोहळ्यातून केलं जात आहे. नोकर्या मागणार्यांची संख्या वाढत आहे आणि देणार्यांची संख्या कमी आहे. हे समीकरण कुठंतरी जुळायला हवं.’
पुरस्कार्थींचे मनोगत
पुरस्काराला उत्तर देताना हंडीबाग म्हणाले, उपलब्ध संधीचा योग्य उपयोग करायला हवा. समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ मनात कायम असायला हवी. आपल्या वैयक्तिक अडचणींवर मात करत इतरांच्या अडचणी जाणून त्या सोडवायला पाहिजेत. पुरस्कार मिळणे हे आणखीन चांगले काम करण्याची प्रेरणा आहे.
कल्याणकर म्हणाल्या, मनात एखादी गोष्ट पक्की ठरवली आणि तिला सध्या करण्याचं ध्येय ठेवलं तर सर्व गोष्टी सहज शक्य आहेत
फल्ले म्हणाले, उद्योगाच्या विकासामध्ये कामगारांची भूमिका महत्त्वाची आहे. मला जो आज सन्मान मिळाला आहे, तो केवळ माझा नसून तो पूर्णतः माझ्या कामगारांचा आहे. प्रास्ताविक पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले. आभार जयवंत भोसले यांनी व्यक्त केले.