लखनौ : देशाच्या विकासासाठी उत्तर प्रदेशचा विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांनी जातीपातीचा विचार न करता राज्याच्या विकास आणि भविष्याचा विचार करुन मतदान करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची लखनौ ही कर्मभूमी असल्याचे सांगत मोदींनी मतदारांना भावनिक साद घातला.
परिवर्तन रॅलीतले भाषण
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी येथे परिवर्तन रॅली घेतली. यात ते कोणती घोषणा करणार आणि समाजवादी पक्षातील कलहावर काय भाष्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काही लोकांना पैसे कसे वाचवायचे याची चिंता आहे. काही लोकांना फक्त कुटुंबाची चिंता आहे. आम्हालाच फक्त उत्तर प्रदेशच्या विकासाची चिंता आहे, असे सांगत त्यांनी समाजवादी पक्ष आणि बसपवर टीका केली. उत्तर प्रदेशातील सरकारला शेतकर्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. केंद्र सरकारने पूर्ण मदत देऊनही त्यांनी शेतकर्यांकडून धान्य विकत घेतले नाही, असा दावा पंतप्रधानांनी केला. हे लोक म्हणतात मोदी हटाव, तर मी म्हणतो काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला हटवा. आता जनतेनेच ठरवावे त्यांना कोणाला हटवायचे आहे, असे सांगत पंतप्रधानांनी विरोधकांना पुन्हा एकदा आव्हान दिले. उत्तर प्रदेशातील सरकारसाठी विकास ही प्राथमिकताच नाही. एरवी समाजवादी आणि बसपमध्ये वास्तव जात नाही. पण मोदी हटावसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आले, असा चिमटाही त्यांनी काढला. या सभेला झालेल्या गर्दीचाही त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी ऐवढी मोठी सभा बघितली नाही. मी लोकसभा निवडणुकीच्या वेळीही ऐवढा प्रतिसाद बघितला नव्हता. यातून निवडणुकीचा कौल काय असेल याचा अंदाज येतो, असे ते म्हणाले.