देशाच्या विकासासाठी बालसंस्कार आवश्यक : शैलेजा दराडे

0

पुणे । देशाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी बालसंस्कार आवश्यक आहेत. लहानपणापासून मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिल्यास रोगराई आणि घाणीला हद्दपार करण्यास मदत होईल. स्वतः स्वच्छ राहून परिसर स्वच्छ करण्यासाठी प्रत्येकाने वर्षभरात किमान 100 तास काम केले पाहिजे. त्यामुळे समाज हीत जपण्यास मदत होणार आहे, असे मत पुणे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी शैलेजा दराडे यांनी व्यक्त केले.

मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी शासनाच्यावतीने स्वच्छता ही सेवा’ हे अभियान सुरू करण्यात आले. या अभियानाचा शुभारंभ शिक्षणाधिकार्‍यांच्या हस्ते वेल्हे तालुक्यातील आंबवणे प्राथमिक शाळेत करण्यात आला. आरोग्य उत्तम राहण्यासाठी व्यायाम आणि खेळाला प्राधान्य देण्यासाठी फुटबॉलदिनाचे औचित्य साधत या सेवेला प्रारंभ करण्यात आला. गटविकास अधिकार मनोज जाधव, पंचायत समितीच्या सभापती सीमा राऊत यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी याप्रसंगी उपस्थिती होते.

शिक्षणाधिकार्‍यांनी केली साफसफाई
स्वच्छता अभियानानिमित्त शिक्षणाधिकारी शैलेजा दराडे यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह वेल्हे तालुक्यातील आंबवणे शाळेच्या वर्गखोल्यांची स्वच्छता केली. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देऊन महत्व पटवून दिले. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी आणि स्वयंशिस्त लागण्यासाठी अभियान राबविले जात आहे. त्यासाठी शिक्षक, पालक, विद्यार्थी, गावकरी, सामाजिक संस्था, संघटना यांनी पुढे येऊन स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे दराडे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ
शिक्षणाधिकार्‍यांनी मार्गासने प्राथमिक शाळेतही विद्यार्थ्यांसह साफसफाई केली. तसेच मुलांना आणि उपस्थित नागरिकांना स्वच्छतेची शपथ दिली. वर्षभरात मी 100 तास काम करून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच इतरांनाही 100 तास स्वच्छता करण्यासाठी प्रेरीत करण्याची शपथ उपस्थितांनी घेतली. करंजावणे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षणाधिकार्‍यांसमवेत प्रभात फेरी काढली होती. तसेच वेल्हे पंचायत समिती कार्यालयातही यावेळी साफसफाई करण्यात आली.