पुणे । राष्ट्रपिता शेती समृद्ध व महिला सुरक्षित असतील तर देश समृद्ध व सुखी होईल. अर्थात त्यासाठी पर्यावरणपूरक गाव, कचरा निमूर्लन, शुद्ध पाणी व्यवस्था, महिला सुरक्षा, दारूबंदी व अद्ययावत शिक्षण पद्धतीचा वापर ज्या खेड्यात होतो, तेच गाव आणि तीच ग्रामपंचायत खर्या अर्थाने आदर्श व परिपूर्ण असे संबोधिले जाऊ शकते. त्याच दृष्टीने सरपंचांना विकासकार्य करावयाचे आहे. असा सल्ला ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी दिला.
डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ व जिल्हा परिषद यांच्या वतीने आयोजित नवनिर्वाचित सरपंच परिषद-2017च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ.विश्वनाथ कराड होते. यावेळी प्रा. राहुल कराड, यशवंत शितोळे, प्रदीप लोखंडे, संदीप कोहिणकर, योगेश पाटील, नरेंद्र पवार, कमला सावंत व अतुल कोईराल आदी उपस्थित होते. या परिषदेला 100पेक्षा अधिक सरपंच उपस्थित होते.
शितोळे म्हणाले, ग्रामपंचायत ही मूलभूत संस्था असल्यामुळे ती आर्थिकदृष्या प्रबळ कशी ठेवता येईल, यावर सरपंचांनी लक्ष ठेवावे. योगेश पाटील म्हणाले, नियोजन हेच ग्रामीण क्षेत्राच्या प्रगतीचे सर्वात मोठे सूत्र आहे. सामाजिक जीवनात सर्व गोष्टी सहन केल्यानंतरच विकासाची कास धरता येते. प्रा. राहुल कराड म्हणाले, सुशिक्षित विद्यार्थ्यांना खेड्याचे खरे दर्शन कसे घडेल, यासाठी एमआयटीतर्फे 4-5 दिवस खेड्यात अभ्यासासाठी पाठविण्यात येते.
आधी शेतकरी मग व्यापारी
डॉ. मुळीक म्हणाले, जनतेची नेत्याकडून खूप अपेक्षा असते. त्यामुळे सरपंचाने भरपूर काम करून, प्रत्येक सरकारी योजनांचे चांगल्या मार्गाने पैसे मिळवून त्याचा वापर गाव विकासासाठी करावा. ग्रामपंचायतीत ड्रोनचा वापर वाढवावा. त्यामुळे सरपंचाला गावाची व शेतीची खरी स्थिती समजण्यास वेळ लागणार नाही. शेतकर्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला हवा असेल तर गावातील गोष्टी गावातच ठेवा. आधी शेतकरी असतो व मग व्यापारी असतो, ही गोष्ट लक्षात ठेवावी. शेतकर्याला आर्थिकदृष्टया समृद्ध होण्यासाठी शेतीपूरक व्यवसायसुद्धा करायला हवेत.
गावाला केंद्रबिंदू मानून विकास
डॉ.विश्वनाथ कराड म्हणाले, गांधीजींच्या स्वप्नातील भारत कसा असावा, या संदर्भातील ही सरपंच परिषद आहे. जातीच्या शापात अडकलेल्या या देशात छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही कुणाची जात विचारली नव्हती. तीच नीती प्रत्येक सरपंचाने आपल्या ग्रामपंचायतीत विकास करताना आचरणात आणावी. डॉ. पठाण म्हणाले, गाव हा जणू विश्वाचा नकाशा आहे. गावावरूनच देशाची स्थिती कळते. त्यामुळे गावाला केंद्रबिंदू मानून विकास साधावा.आजकाल विकासाच्या नावाखाली गाव मात्र भकास झाले आहे.