कोलकाता । ‘देशात अपयशी ठरलेल्या नेत्यांचं कोणी ऐकत नाही म्हणून हे नेते अमेरिकेत जाऊन भाषण ठोकतात’ अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी आपल्या कोलकाता दौर्यात नुकतेच अमेरिकेतील बर्कले विद्यापीठात विद्यार्थी-विद्यार्थींनीना संबोधित करतांना मोदी यांचेवर अप्रत्यक्षपणे टीका करणार्या राष्ट्रीय काँग्रेसचे राहुल गांधी यांनाच टार्गेट केले. यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वाकयुद्धाला तोंड फुटले आहे.
कुणी विचारत नाही
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. यावरून भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असतांना कोलकाता येथे अमित शहा यांनी राहुल गांधी यांना टार्गेट केले. सध्याचे सरकार कामगिरीला महत्व देते. सरकारची स्थिती काँग्रेस सरकारसारखी नाही. कामगिरीच्या जोरावर सरकार चालवण्याची सुरुवात भाजपने केली. परंतु देशातील काही नेते अमेरिकेत जाऊन भाषणे देतात. कारण त्यांना देशात कोणी विचारत नाही. त्यांचं कोणी ऐकून घेत नाहीत, असा टोला अमित शहा यांनी मारला. राहुल गांधींच्या अमेरिकेतील भाषणात घराणेशाहीचा उल्लेख होता. ‘संपूर्ण देशात घराणेशाही आहे. अखिलेश यादव यांच्यापासून अभिषेक बच्चन यांच्यापर्यंत सगळीकडेच घराणेशाही पाहायला मिळते,’ असे राहुल गांधींनी म्हटले. यावर अमित शहा म्हणाले की, राजकारणातील घराणेशाही बाजूला सारण्यात भाजपचा मोठा वाटा आहे.