देशातील असहिष्णुतेवर आता गुलजारांचे बोट!

0

बेंगळुरू : देशातले सध्याचे वातावरण चिंता निर्माण करणारे आहे, धर्म हा माणुसकीपेक्षा मोठा झाला; असे वातावरण या आधी देशात कधी पाहिले होते? असे म्हणत ज्येष्ठ कवी आणि गीतकार पद्मभूषण गुलजार यांनी खंत व्यक्त केली. देशात याआधी कोणीही माणूस बिनधास्त आपले म्हणणे मांडू शकत होता, आता मात्र तशी स्थिती राहिली नाही. देशासमोर आर्थिक संकट होते मात्र धार्मिक संकट कधीही नव्हते, आता आपल्या देशात नाव विचारण्याआधी माणसाचा धर्म विचारला जातो ही परिस्थिती दुर्दैवी आहे, अशी खंतही गुलजार यांनी व्यक्त केली. बेंगळुरूतील कवी संमेलनात ते बोलत होते. देशाने राजकीय स्वातंत्र्य प्राप्त केले, सामाजिक स्वातंत्र्य केव्हा मिळेल? असा सवालही त्यांनी याप्रसंगी केला.

मागासलेल्या मानसिकतेतून बाहेर आलो नाहीत!
गुलजार म्हणाले, आपल्या देशात तामिळ, गुजराती, मराठी, बंगाली यांसह अनेक भाषांना प्रांतिय भाषांचा दर्जा दिला जातो; मात्र या भाषांना प्रांतिय म्हणणे चूक आहे, या भाषा देशातल्या प्रमुख भाषा आहेत. देशातल्या महाविद्यालयांमध्ये इंग्रजी साहित्य शिकवले जाते मग भारतीय परंपरा का शिकवली जात नाही? कालिदास, युधीष्ठीर, द्रौपदी हे विषयही अभ्यासण्यासारखे आहेत. आपल्या संस्कृतीशी नाते सांगणारे जे विषय आहेत ते जर देशभरातल्या महाविद्यालयांमध्ये शिकवले गेले तर येणार्‍या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख होईल. सआदत मंटोसारख्या आधुनिक लेखकाबाबतही महाविद्यालयांमध्ये शिकवले पाहिजे. भारतात सध्याच्या घडीला राजकीय स्वातंत्र्य आहे मात्र सांस्कृतिक स्वातंत्र्य नाही. आपण मागासलेल्या मानसिकतेतून अजून बाहेरच आलेलो नाहीत, अशी खंतही गुलजार यांनी व्यक्त केली.

कलबुर्गींच्या हत्येवर खेद व्यक्त
चंद्रावर पाऊल ठेवणार्‍या नील आर्मस्ट्राँग यांचा मृत्यू झाला तेव्हा मला अतीव दु:ख झाले, मात्र त्यांच्या मृत्यूविषयी भारतात एकाही माणसाने काहीही लिहिले नाही याचे जास्त वाईट वाटले. आपण आपले आयुष्य काही तुकड्यांमध्ये जगतो, कारण आपल्याला ते सोपे वाटते, सुधारमतवादी लेखक डॉक्टर कलबुर्गी यांच्याबाबत मी लिखाण केले आहे. धारवाडमध्ये त्यांची गोळी घालून हत्या करण्यात आली त्यावेळी मला वेदना झाल्या. विविध भाषांमध्ये त्यांनी लिखाण केले होते, लेखनाला वेगळी उंची गाठून देणार्‍या माणसाचा शेवट आपल्या देशात असा होतो? हे वातावरण खूपच वाईट आहे असेही गुलजार यांनी सांगितले. आजवर अनेक कवी, लेखक आणि साहित्यिकांनी देशातल्या असहिष्णू वातावरणावर भाष्य केले आहे. आता त्या सगळ्यांमध्ये ज्येष्ठ गीतकार गुलजार यांचाही समावेश झाला आहे.