नवी दिल्ली : कथित गोरक्षकांकडून होणार्या मारहाणीच्या घटना आणि अन्य गोवंश हत्या बंदीसंदर्भात येणार्या अडचणी आणि भारत-बांग्लादेश सीमेवर गायींचे संरक्षण, प्राण्यांची तस्करी यासंदर्भात केंद्र सरकारने एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर करण्यात आला. केंद्राने न्यायालयात सांगितले की, संयुक्त सचिव, गृह मंत्रालय यांच्या अध्यक्षतेखाली एका समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने याबाबत काही महत्वाच्या सुचना मांडल्या आहेत. यामध्ये देशातील गायींना व त्यांच्या वासरांचा शोध घेण्यासाठी, माहिती जतन करण्यासाठी आणि त्यांना ओळख देण्यासाठी वैश्विक ओळख क्रमांक (युआयडी) देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
या आहेत महत्वाच्या शिफारशी
केंद्राने स्थापन केलेल्या समितीने केलेल्या शिफारशींमध्ये बेवारस जनावरांची जबाबदारी प्रामुख्याने राज्य सरकारांची असेल, प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी 500 जनावरांसाठी कोंडवाडे असावेत. जेणेकरून बेवारस जनावरांच्या तस्कारीवर नियंत्रण मिळवता येईल. दुध देण्याच्या वयात येईपर्यंत जनावरांची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे. संकट काळात शेतकर्यांसाठी योजना सुरू केली पाहिजे; ज्यामुळे ते भाकड जनावरांचीही काळजी घेऊ शकतील. सध्याच्या कोंडवाड्यांची आवस्था वाईट असून गायींसाठीच्या कोंडवाड्यांना राज्य सरकारांनी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. भारतातील प्रत्येक गायीला व तिच्या वासरांना एक वैश्विक ओळख क्रमांक असल्यास त्यांचा शोध घेणे सोपे होईल. गायीला किंवा वासरांना दिलेल्या वैश्विक ओळख क्रमांकामध्ये वय, लिंग, जात, स्तनपान, ऊंची, शरीर, रंग, शिंगांचा प्रकार, शेपूट आदी माहितीसह विशेष अंकाचे विवरण असणे गरजेचे आहे. शिवाय हा वैश्विक ओळख क्रमांक संपुर्ण देशभरात बंधनकारक असला पाहिजे. बांग्लादेशात होणारी पशुंची तस्करी रोखण्यासाठी नागरिकांना सहाकार्याचे आवाहन केले पाहिजे. नागरिकांना टोल फ्री क्रमांकाव्दारे रस्त्यावर फिरणार्या जनावरांची माहिती देण्यासाठी आवाहन केले पाहिजे, अशा शिफारशी या अहवालात समितीने केल्या आहेत.
भारतीय गायींना मिळते मोठी किंमत
बांग्लादेशात गोमांसाला सर्वाधिक मागणी आहे. येथे भारतीय गायींना मोठी किंमत दिली जाते. बीएसएफच्या माहितीनुसार भारतातील सुमारे साडेतीन लाख गायी दरवर्षी चोरवाटेने बांग्लादेशात नेऊन विकल्या जातात. या तस्करीची वार्षीक उलाढाल सुमारे 15 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे. गृहमंत्रालयाच्या माहितीनुसार 2014 ते 2015 या वर्षात बीएसएफने गायींची तस्करी करणार्या 34 जणांना चकमकीत ठार मारले आहे. तसेच बांग्लादेश सीमेवरून बीएसएफने दररोज 200 ते 250 गायींची तस्कारांच्या तावडीतून सुटका केली आहे. आसाम हे गायींच्या तस्कारींचे केंद्र असून येथे बांग्लादेशची 263 किलोमीटरची सीमा आहे. याच सीमेवरून गायींची तस्करी केली जाते.