मुंबई । देशाच्या राष्ट्रपतीपदी गोविंद असो की गोपाळ, त्याने जनतेला काय फरक पडतो. देशातील जनतेसाठी या पदावरील व्यक्तीचा उपयोग काय, हा सवाल आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा. सध्या राष्ट्रपती निवडणुकीचे वारे वाहत असताना राज यांनी प्रथमच आपली भूमिका मांडली. याकूब मेमन प्रकरण वगळता कुठल्याही राष्ट्रपतीने आजवर कधी जनहिताची भूमिका मांडलेली नाही. राष्ट्रपती म्हणजे ज्या पक्षाचे सरकार आहे त्या पक्षाचा रबर स्टॅम्प, असे राज म्हणाले. या संवैधानिक पदाबाबत देशात प्रथमच कुणी इतक्या रोखठोकपणे जाहीर भूमिका मांडली आहे.
राष्ट्रपती म्हणजे रबर स्टॅम्प हे आज नव्हे तर गेली कित्येक वर्षे बोलले जातेय, असे राज यांनी स्पष्ट केले. सरकारकडून सुरु असलेल्या दडपशाहीविरोधात राष्ट्रपतींना देशभरातून नागरिक मोठ्या प्रमाणावर पत्र, ई-मेल पाठवतात. त्यांना उत्तरे तरी दिली जातात का? राष्ट्रपती म्हणजे काही नाही, तर तो एक शून्य आहे. देशातील जनतेला राष्ट्रपती या व्यक्तीचा काही उपयोग नाही, मग त्या पदावर कोणीही बसले तरी काही फरक पडत नाही, असे राज म्हणाले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय असो किंवा इतर कोणतेही आंदोलन, कुठेही राष्ट्रपतींचा उपयोग होत नाही. ते जर असल्या जनतेच्या विषयात येताच नसतील तर मग हे राष्ट्रपती करतात काय? जरा आठवून बघा किती राष्ट्रपती झाले आणि त्यांच्यामुळे देशात काहीतरी झालेय का ? अशा तीव्र शब्दात राज यांनी या पदाबाबतच्या भावना बोलून दाखविल्या.