देशातील नद्यांची सुरक्षितता महत्त्वाची

0

डॉ. एस. एन. पठाण यांचे प्रतिपादन

आळंदी : नद्यांच्या सुरक्षिततेसाठी इंग्लंडसह फ्रान्स, जपान, इटली आदी देशांनी घाटांची बांधणी केली आहे. आपल्या देशातही अशा प्रकारचे घाट बांधल्यास देशातील नद्यांची सुरक्षितता होऊन नद्यांचे प्रदूषणही कमी होईल, तसेच नद्यांची मूळची शुद्धता टिकविण्यास मदत होईल, असे मत नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस. एन. पठाण यांनी व्यक्त केले. विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीसंत ज्ञानेश्‍वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’, विश्‍वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली यांच्या 722 व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त लोकप्रबोधनपर जागतिक सहिष्णुता सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी वारकरी प्रबोधन महासमितीचे अध्यक्ष रामेश्‍वर महाराज शास्त्री, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, आळंदी नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष सागर भोसले, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, बाळासाहेब रावडे, इंद्रायणी मातेच्या आरतीचे मानकरी गणपत कुर्‍हाडे, नंदकुमार वडगावकर, सुरेश वडगावकर, एमआयटी अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य प्रा. डॉ. वाय. जे. भालेराव, समाजिक कार्यकर्ते मनोहर दिवाणे हे उपस्थित होते.

अध्यात्माची कास धरा
सध्या माणसाचे जीवन ताणतणावाचे झाले असून, अशावेळी अध्यात्माची कास धरणे गरजेचे आहे, असे सांगून डॉ. पठाण पुढे म्हणाले, ज्ञान, भक्ती आणि कर्म या त्रिसूत्रीवर वारकरी सांप्रदाय उभा असून, ज्ञानेश्‍वर माउलींनी जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन भागवत धर्माची पताका जगभर परसविली आहे. उपनगराध्यक्ष भोसले म्हणाले, आळंदी-देहू परिसर विकास समितीाध्यमातून डॉ. विश्वनाथ कराड यांनी आळंदीच्या वैभवात भर टाकलेली आहे. डॉ. वि. दा. कराड म्हणाले, वारकरी संप्रदाय हा खरा सहिष्णु संप्रदाय असून, तो संप्रदाय म्हणजे त्याग व समर्पणाचे मूर्तीमंत प्रतीक आहे. बाळासाहेब रावडे, सुरेश वडगावकर, अशोक उमरगेकर आदींची भाषणे झाली. शालीग्राम खंदारे यांनी प्रास्ताविक केले. विश्‍वशांती प्रार्थनेने कार्यक्रमाचा प्रारंभ तर इंद्रायणी मातेच्या आरतीने हरिनाम गजरात पहिल्या दिवसाच्या उपक्रमाची सांगता झाली. तसेच रामेश्‍वर महाराज शास्त्री यांचे सुश्राव्य कीर्तन इंद्रायणी नदी घाटावर झाले.