डॉ. विजय भटकर यांचे प्रतिपादन : एमआयटीतर्फे आयोजित ‘ज्ञान-जागर’ कार्यक्रमाचे उद्घाटन
लोणी काळभोर : जगात भारताची ज्ञानामुळे ओळख आहे. या देशात सर्वात प्राचिन नालंदा विद्यापीठ आहे. येथून सुख, समाधान आणि मानवता कल्याण या ज्ञानाचा प्रसार होता. सर्व धर्मांचे धर्मग्रंथ आणि वेद हे ज्ञानाचे भांडार आहेत. त्यामुळे देशातील सर्व विद्यापीठात ज्ञानाची शिकवण देणार्या ग्रंथालयाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जागतिक किर्तीचे संगणक शास्त्रज्ञ व नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी केले.
स्वामी विवेकानंद यांच्या 156 व्या जयंतीनिमित्त एमआयटीतर्फे 21 व्या शतकात भारत विश्व गुरू होणार या विषयावर लोणी काळभोर येथील तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली विश्व शांती प्रार्थना सभागृहात तीन दिवसीय ज्ञान-जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. स्वामी राधिकानंद सरस्वती, एमआयटी युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड, प्रा. प्रकाश जोशी, डॉ. सुनील राय, तुळशीराम दा. कराड उपस्थित होते.
सर्वांनी कर्माधिष्ठित व्हावे
विज्ञान युगात डेटा सायन्स या विषयाला अत्यंत महत्त्व आहे. त्याला ही ज्ञान म्हटले जाते. 21 व्या शतकात भारत विश्वगुरू होणार हा स्वामी विवेकानंद यांचा संदेश सार्थक ठरविण्यासाठी सर्वांना कर्माधिष्ठित होण्याची गरज आहे. सर्वांच्या समस्यांचे समाधान ज्या मार्गाद्वारे होते, त्याला ज्ञान म्हणतात. ज्ञानेश्वरी जगाला सुख, समाधानाचे मार्ग दाखवते. भविष्यात भारत ज्ञानाद्वारे जगातील सर्व देशांना विकासाच्या आणि प्रगतीच्या पथावर नेण्याचे कार्य करेल, असे डॉ. विजय भटकर यांनी सांगितले.
आध्यात्मिक ज्ञानाद्वारे कल्याणाचा संदेश
ज्ञान सर्व प्रकारच्या प्रश्नाचे उत्तर देतो. सत्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा मार्ग ज्ञान दाखवते. आध्यात्मिक ज्ञानाद्वारे सर्वांच्या कल्याणाचा मार्ग सापडतो. आध्यात्मिक ज्ञानाद्वारे सर्वांच्या कल्याणाचा संदेश दिला आहे. सर्व धर्म ग्रंथात ज्ञानाची व्याख्या दिली आहे. भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून सुख, समाधान आणि शांतीचे संदेश दिले जातात. जगाने भारताकडे ज्ञानाचे दालन म्हणून पाहवे, यासाठीच या जगातील सर्वात मोठ्या गोल घुमटाची निर्मिती करण्यात आली आहे, असे राधिकानंद सरस्वती यांनी सांगितले.
मानवतेचा संदेश
जगात ज्ञानाचे जागर करण्याची गरज आहे. या माध्यमातून जगाला मानवतेचा संदेश देण्याचे कार्य होईल. ज्ञानाची पूजा आणि सत्याचा शोध हे भारतीय संस्कृतीचा प्रमुख मार्ग आहे, असे डॉ. विश्वनाथ कराड यांनी सांगितले. यानंतर प्रख्यात गायक महेश काळे यांनी ज्ञानस्वरूप भक्ती संगीत कीर्तनाचे सादरीकरण करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. प्रा गौतम बापट आणि प्रा. स्नेहा यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मंगेश कराड यांनी आभार मानले.