देशातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये ‘स्वच्छता अभियान’

0

जळगाव : डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा (ता.अलिबाग जिल्हा रायगड) यांच्या सौजन्याने प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे स्वच्छतादूत पद्मश्री डॉ.श्री.अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दि.1 मार्च 2017 रोजी संपूर्ण भारत देशात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या स्वच्छता अभियानात भारत देशातील सर्व राज्यांमधील जिल्हे व तालुकास्तरावरील सर्व सरकारी कार्यालयांचे आवार तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांची स्वच्छता केली जाणार आहे. या अभियानात लाखोंच्या संख्येने श्रीसदस्य सहभागी होणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयापासून प्रारंभ

थोर समाजसुधारक डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री डॉ.दत्तात्रय नारायण तथा अप्पासहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दि.1 मार्च रोजी संपूर्ण भारत देशात स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे. जळगाव जिल्ह्यात राबविल्या जाणार्‍या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जिल्हाधिकारी श्रीमती रूबल अग्रवाल, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय, मनपा आयुक्त, महापौर, तसेच मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयांचे आवार तसेच प्रमुख रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी हजारोंच्या संख्येने श्रीसदस्य सहभागी होणार आहेत. या स्वच्छता अभियानास आपलेही सहकार्य लाभावे व आपणही यात सहभागी व्हावे यासाठी डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक सरकारी कार्यालयांना पत्र दिले आहेत.

शासकीय कार्यालय प्रमुखांना सूचना
प्रतिष्ठानच्या वतीने राबविल्या जाणार्‍या स्वच्छता अभियानास सर्व शासकीय कर्मचारी, अधिकार्‍यांनी सहभागी होवून स्वच्छतेसाठी श्रीसदस्यांना सहकार्य करावे व आपले योगदान द्यावे अशा सूचना जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल, पोलीस अधिक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय, वन विभाग अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांना दिल्या असून याबाबतचे पत्र, व्हॉट्सअप मेसेज पाठविण्यात आले आहेत.

शासनावर कोणताही भार नाही
डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे राबविल्या जाणार्‍या स्वच्छता अभियानात हजारोंच्या संख्येने श्रीसदस्य स्वयंस्फुर्तीने सहभागी होणार असून या अभियानास दि.1 रोजी सकाळी 7 वा. प्रारंभ होणार आहे. अभियान राबवित असताना प्रशासनाचे सहकार्य अपेक्षीत आहे. परंतु शासनावर याचा कोणताही बोजा पडणार नाही याची दक्षता घेतली जाणार असून स्वच्छतेसाठी लागणारे हातमोजे, झाडू, मास्क, कचरा उचलण्याचे साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुरविण्यात येणार आहे. तसेच जमा केलेला कचरा सरकारी अथवा खासगी वाहनांतून योग्य स्थळी पोहोचविण्यात येणार आहे.

येथे होणार स्वच्छता
या स्वच्छता अभियानात जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय आवार तसेच प्रमुख रस्त्यांची स्वच्छता केली जाणार असून यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव, उपविभागीय कार्यालय- जामनेर, एरंडोल, अमळनेर, पाचोरा, भुसावळ. तहसिल कार्यालये- जळगाव, भडगाव, जामनेर, एरंडोल, धरणगाव, भुसावळ, रावेर, अमळनेर, पारोळा, चोपडा, पाचोरा, चाळीसगाव. नगररचना कार्यालय- अमळनेर, जिल्हा न्यायालय जळगाव, तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालय- जामनेर, एरंडोल, धरणगाव, भुसावळ, रावेर, यावल, अमळनेर, पारोळा, चोपडा. पोलीस अधिक्षक कार्यालय जळगाव, पोलीस ठाणे- भडगाव, जामनेर, एरंडोल, धरणगाव, भुसावळ (बाजार, शहर, तालुका), रावेर, यावल, अमळनेर, पारोळा, चोपडा, पाचोरा, चाळीसगाव. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय चाळीसगाव. वन विभाग- जळगाव, जामनेर, एरंडोल, चाळीसगाव. कोषागार कार्यालय- पाचोरा, पारोळा, भडगाव. आर.टी.ओ.कार्यालय जळगाव, जामनेर. सा.बां.विभाग- जळगाव, जामनेर, एरंडोल, भुसावळ, यावल (आदिवासी प्रकल्प व सा.बां.खाते), चाळीसगाव. समाज कल्याण व पाटबंधारे ऑफीस- जळगाव, जामनेर. पाटबंधारे दगडी बिल्डींग (नारायणवाडे) चाळीसगाव. उपविभागीय अधिकारी लघु पाटबंधारे- जामनेर. भुमी अभिलेख कार्यालय- पारोळा, भुसावळ. जिल्हा रूग्णालय जळगाव, उप जिल्हा रूग्णालय- भडगाव, जामनेर, अमळनेर, चोपडा, पाचोरा, चाळीसगाव. नगरपरिषद रूग्णालय- धरणगाव, भुसावळ. ग्रामीण रूग्णालय- यावल, रावेर. जिल्हा पशू चिकित्सालय जळगाव. पशू वैद्यकीय दवाखाना- धरणगाव, भुसावळ, यावल. पुटीर रूग्णालय- एरंडोल, पारोळा. जिल्हा परिषद- जळगाव (जुनी व नवीन). पंचायत समिती- भडगाव, एरंडोल, भुसावळ, यावल, अमळनेर, पारोळा, चोपडा, चाळीसगाव. नगरपालिका- जामनेर, धरणगाव, भुसावळ, यावल. नगरपरिषद- एरंडोल, चाळीसगाव. दूरक्षेपण कार्यालय- जळगाव, जामनेर. दूरसंचार कार्यालय एरंडोल. शासकीय आय.टी.आय. आदी कार्यालयाच्या आवारातील स्वच्छता केली जाणार असून यात शहरातील प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे.

प्रतिष्ठिानतर्फे विविध सामाजिक उपक्रम
डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान विविध सामाजिक उपक्रमांसाठी ख्यात आहे. निसर्ग रक्षण, पर्यावरण, स्वच्छता, एस.टी.निवारे, शैक्षणिक मदत, वृक्ष लागवड व संवर्धन, विहीर स्वच्छत व साफसफाई, जल पुनर्भरण, प्रौढ साक्षरता वर्ग, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, नद्या व धरणातील गाळ काढणे आदी समाजपयोगी विविध उपक्रम प्रतिष्ठान तर्फे राबविले जातात. प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात आलेल्या महा आरोग्य शिबीर, महाराष्ट्र स्वच्छता अभियानाची ‘लिमका बुक ऑफ रेकार्ड’ मध्ये नोंद झाली आहे. दि.1 मार्च रोजी राबविले जाणारे संपूर्ण भारतातील स्वच्छता अभियान सुध्दा एक ‘रेकॉर्ड’च होणार आहे.