हैदराबाद: जी व्यक्ती भारताला आपली मातृभूमी मानते, देशातील जन, जल, जमीन, प्राणी यांसह संपूर्ण भारतावर प्रेम करते, भारताची भक्ती करते, भारताच्या संस्कृतीला आपल्या जीवनात स्थान देतो, अशी कोणतीही व्यक्ती जी कोणतीही भाषा बोलत असेल, ती कोणत्याही प्रांतातील असेल, पूजा अर्चना करत असेल किंवा करत नसेल तो भारतमातेचा सुपुत्र हिंदू आहे. त्यामुळे भारतातील १३० कोटी लोक हे हिंदूच आहेत. हा संपूर्ण समाज आपला आहे आणि असा एकात्मिक समाज निर्माण करण्याचे संघाचे ध्येय आहे, असं भागवत म्हणाले.
धर्म आणि संस्कृतीवर लक्ष न देता जे लोक राष्ट्रवादाची भावना जोपासतात, भारताची संस्कृती आणि वारशाचा सन्मान करतात ते सर्व हिंदू आहेत. संपूर्ण भारतीय समाज आमचा असून संघाचा उद्देश संघटित समाजाची निर्मिती करणे हाच असल्याचेही ते म्हणाले. तेलंगणमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांकडून आयोजित तीन दिवसीय विजय संकल्प शिबिरात भागवत उपस्थितांना संबोधित करत होते.
सर्वांच्या प्रगतीसाठी आपण एकत्र यायला हवं. या विचारालाच जग हिंदू विचार मानते. हाच भारताचा परंपरागत विचार आहे. लोकं म्हणतात आम्ही हिंदूत्ववादी आहोत. परंतु आम्ही परंपरेने हिंदुत्ववादी आहोत, असंही ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सर्वांचा विचार करतो आणि त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहे, असंही ते यावेळी म्हणाले. विविधतेत एकता हे प्रचलित वाक्य आहे. परंतु आपला देश एक पाऊल पुढे आहे. आम्ही विविधतेत एकता नाही तर विविधता ज्या एकतेतून आली आहे त्याचा शोध आम्ही घेत आहोत, असंही त्यांनी नमूद केलं