देशातील 170 संघटना शेतकर्‍यांच्या पाठिशी – खासदार शेट्टी

0

जळगाव । स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून 15 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर दरम्यान तेलंगाणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ या राज्यातून संघर्ष यात्रा काढण्यात आली. या यात्रेला या राज्यातून चांगला प्रतिसाद मिळाला असून तिसरी यात्रा 2 ऑक्टोबरपासून बिहार, उत्तरप्रदेश, ओडीसा या भागात आणि चौथी पुर्व भागात पश्‍चिम बंगाल, आसाम काढणार असून याचा समारोप 20 नोव्हेंबर रोजी दिल्लीला करणार आहोत. यावेळी लोकसभाचे अधिवेशन राहाणार आहे. यात देशभरातून किमान दहा लाख शेतकरी एकत्रीत येण्याचा अंदाज आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी दोनच गोष्टींकडे अधिक लक्ष केंद्रीत केले असून यात ‘शेतकर्‍यांना उत्पदन खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळावा आणि संपुर्ण देशातील शेतकर्‍यांचा सातबारा कोरा पाहिजे’. यासाठी देशभरातील 170 संघटना शेतकर्‍यांच्या पाठीशी असून इतिहासात पहिल्यांदा शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करत असल्याने याला देशातून प्रचंड प्रमाणावर प्रतिसाद असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार राजू शेट्टी यांनी जनशक्तिशी बोलतांना सांगितले. मंगळवारी राज्यव्यापी भव्य शेतकरी संपुर्ण कर्जमुक्ती व हमीभाव शेतकरी परीषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर अजिंठा विश्रामगृहात ते बोलत होते.