देशातील 73 टक्के संपत्ती 1 टक्के श्रीमंतांकडे, आर्थिक दरी वाढली!

0

दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफॅम संस्थेचा अहवाल

दावोस : भारतातील 1 टक्का श्रीमंताकडे देशातील 73 टक्के संपत्ती असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. तर 67 कोटी भारतीयांच्या संपत्तीमध्ये फक्त एक टक्क्यांनी वाढ मागील वर्षात झाल्याची माहिती रविवारी प्रसिद्ध झालेल्या ऑक्सफॅम या संस्थेच्या रिवॉर्ड वर्क, नॉट वेल्थ या अहवालात देण्यात आली आहे. या अहवालातून भारतातील गरीब आणि श्रीमंतांमधील दरी मोठ्याप्रमाणात वाढत चालल्याचे स्पष्ट झाले आहे. जागतिक पातळीवर गेल्या वर्षभरात तयार झालेल्या एकूण संपत्तीतील 82 टक्के वाटा हा एक टक्का लोकांकडे गेला. तर 3 अब्ज 70 लाख लोकांच्या संपत्तीमध्ये काहीच वाढ झालेली नाही.

विषमतेचे चिंताजनक प्रमाण
देशातील आणि जागतिक पातळीवरील आर्थिक विषमता या अहवालातून समोर येत असते. दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या या अहवालाचे निरीक्षण आणि त्यावरील चर्चा फोरममध्ये होईल. वाढते उत्पन्न आणि लैंगिक भेदभाव हे या फोरममधील चर्चेचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. गेल्यावर्षीच्या सर्व्हेनुसार, 1 टक्का भारतीयांकडे एकूण संपत्तीच्या 58 टक्के वाटा होता. त्यावेळी जागतिक पातळीवर हे प्रमाण 50 टक्के इतके होते. 2017 मध्ये भारतातील 1 टक्का श्रीमंतांची संपत्ती 20.9 लाख कोटींनी वाढली होती. हे प्रमाण केंद्र सरकारच्या 2017-18 च्या एकूण बजेटइतके होते, असे ऑक्सफॅमने म्हटले आहे.

अब्जाधीशांची संख्या वेगाने वाढ
2017 सालात अब्जाधीशांची संख्या दर दोन दिवसाला एक इतक्या वेगाने वाढली आहे. अब्जाधीशांची संपत्ती 2010 पासून दरवर्षी सरासरी 13 टक्क्यांच्या वेगाने वाढली आहे. सामान्य नोकरदाराच्या उत्पन्नवाढीच्या वेगाच्या तुलनेत हा दर सहापट अधिक आहे. सामान्यांच्या वार्षिक उत्पन्नवाढीचा वेग सरासरी 2 टक्के आहे, असे या अहवालात म्हटले आहे. भारतातही फार वेगळे चित्र नाही. भारतातील एक टक्का श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये जवळपास 20.9 लाख कोटी रुपयांनी वाढ झाली. जगातील 10 देशांमधील सुमारे 70 हजार लोकांची मते जाणून घेतल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. सीईओंच्या पगारात कपात करावी, असे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 60 टक्के लोकांना वाटते. भारतातील 37 टक्के अब्जाधीशांकडे वारसाहक्काने संपत्ती आल्याचे अहवालातून समोर येते.

हे ढासळत्या अर्थव्यवस्थेचे लक्षण
ऑक्सफॅमच्या भारतातील सीईओ नीशा अग्रवाल यांनी या अहवालावर चिंता व्यक्त केली. केंद्र सरकारकडून दिल्या जाणार्‍या आर्थिक सोयीसुविधांचा लाभ मूठभर लोकांपर्यंतच पोहोचत असल्याचे यानिमित्ताने दिसते, असे त्या म्हणाल्यात. अब्जाधीशांची वाढती संख्या हे चांगल्या अर्थव्यवस्थेचे लक्षण नाही. तर ढासळत्या अर्थव्यवस्थेचे लक्ष आहे. एकीकडे बांधकाम साईटवर काम करणारे मजूर, शेतमजूर, कंपनीत काम करणारे कामगार यांच्याकडे मुलांच्या शिक्षणासाठी, औषधांच्या खरेदीसाठीही पैसे नाही. तर दुसरीकडे, अब्जाधीश वाढत आहेत, याकडे अग्रवाल यांनी लक्ष वेधले. भारतात फक्त 4 महिला अब्जाधीश असून, यातील तीन जणांकडे वारसाहक्काने संपत्ती आली आहे. देशातील 101 अब्जाधीशांपैकी 51 जण हे 65 वर्षांवरील आहेत. त्यांच्याकडे एकूण 10 हजार 544 अब्ज रुपये इतकी संपत्ती आहे. अब्जाधीशांच्या संपत्तींमध्ये 2010 पासून वर्षाला सरासरी 13 टक्के या वेगाने भर पडत आहे.