देशात असहिष्णुता का वाढतेय?

0

माजी राष्ट्रपतींच्या वक्तव्यावर भाजपच्या काही नेत्यांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, अन्सारी जे बोलले त्याबद्दल केंद्र सरकार व सत्ताधारी भाजपने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांनी माजी उपराष्ट्रपतींच्या बोलण्यातला धागा पकडून भाजपला बजावले आहे की, भाजपने आता ‘जातीयवाद छोडो’ हे अभियान सुरू करावे. भारतीय मुसलमानांना स्वतःची ओळख, शिक्षण, सुरक्षा व सशक्तीकरण करण्यास अपयश येत असून केंद्रातील मोदी सरकारने मुस्लीम समाजासोबतच्या भेदभावाची चूक सुधारावी, असे विधान माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी पदमुक्त झाल्यानंतर केले आहे. देशात असहिष्णुता व तथाकथित गोरक्षकांच्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर अन्सारी यांनी हे वक्तव्य केले आहे. देशात मुस्लीम व अल्पसंख्याकांच्या मनात एक अनामिक दहशत बसली आहे, केंद्र सरकारने ही कांडी सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे वक्तव्य दीड महिन्यापूर्वी उत्तर प्रदेशातील भाजप पक्षाच्याच अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षांनी व्यक्त केले होते. त्यावेळी मोदी यांनी तथाकथित गोरक्षकांना कायदा हातात न घेण्याचा इशारा दिला होता. हमीद अन्सारी यांनी नुकताच गुरुवारी आपल्या उपराष्ट्रपतीपदाचा काळ पूर्ण केला. ते पदमुक्त झाल्यानंतर घेतलेल्या एका वृत्तवाहिनीसमोर बोलताना त्यांनी मनातील अस्वस्थता प्रकट केली. त्यांनी प्रधानमंत्री मोदी व केंद्र सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केल्याचे दिसते. अन्सारी या मुलाखतीत म्हणतात की, मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळासमोर हा प्रश्‍न यापूर्वीच उपस्थित केला होता. देशातील नागरिकांच्या राष्ट्रीयत्वावर शंका घेणे, हे अत्यंत विचलित करणारे आहे. तथाकथित गोरक्षकांचे हिंसक हल्ले, कथित घरवापसी, राष्ट्रवादाचा अतिरेक, अंधश्रद्धांचा विरोध करणार्‍यांची हत्या या घटना भारतीय मूल्यांना व संस्कृतीला मारक ठरत आहेत. आपल्याच नागरिकांची कायदा व सुव्यवस्था लागू करण्याची सरकारी अधिकार्‍यांची क्षमता वेगवेगळ्या स्तरावर कमी पडत आहे. देशातील मुस्लीम समाजात आज भीतीची व असुरक्षिततेची भावना आहे. देशाच्या विविध भागांतून अनेक घटना मला ऐकायला मिळत आहेत.

भारतीय समाज वर्षानुवर्षे विविधतावादी आहे. पण आता हे वातावरण धोक्यात आहे. देशातील नागरिकांच्या भारतीयत्वावर शंका घेण्याची प्रवृत्ती अतिशय चिंताजनक आहे. माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या वक्तव्याने भाजपमध्ये मोठी खळबळ माजली आहे. परंतु, अन्सारी यांच्यावर टीका करण्यात ही मंडळी धन्यता मानतील. परंतु, त्यातून काही बोध घ्यावा, असे सत्ताधा़रंना वाटत नाही. माजी उपराष्ट्रपती यांनी जे वक्तव्य केले आहे, ती मुस्लीम समाजाच्या मनातील खदखद त्यांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने यावर गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यानंतर आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सीताराम येच्युरी यांनी सत्ताधारी भाजपवर अप्रत्यक्षरीत्या टीका केली आहे. भारत देशाला ‘हिंदू-पाकिस्तान’ बनवण्याचा प्रयत्न होत असल्याची भीती सीताराम येच्युरी यांनी व्यक्त करत भाजपवर निशाणा साधला आहे. त्याप्रमाणेच भारतात ‘जातीयवाद छोडो’ आंदोलन उभारण्याची गरज असल्याचे मत येच्युरी यांनी व्यक्त केले आहे. ‘चले जाव’ चळवळीच्या स्मृति दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात येच्युरी बोलत होते.1942 साली सुरू झालेल्या ‘चले जाव’ आंदोलनात हिंदू, मुस्लीम, दलित, ब्राह्मण आणि राजपूत लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. जातीधर्माच्या या एकतेमुळेच देशाला स्वातंत्र्य होऊ मिळाले, असे येच्युरी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या भाषणाचा हवाला देत येच्युरी म्हणाले की, भारतासाठी 1942 ते 47 पर्यंतचा पाच वर्षांचा कालावधी फार महत्त्वाचा ठरला होता. त्याप्रमाणेच 2017 ते 22 हा काळसुद्धा महत्त्वाचा आहे. 1942 ते 47 या पाच वर्षांत आम्ही देशाचे विभाजन पाहिले. तेव्हा देशात जातीयवादामुळे ध्रुवीकरण झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच देश विभागून त्याची फाळणी झाली, याचीही आठवण येच्युरी यांनी करून दिली. गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपवर त्यांनी गंभीर आरोप केले होते.
अमोल देशपांडे – 9987967102