शरद पवारांचा केंद्र सरकारवर घणाघात
कर्जत : देशात एकाधिकारशाही वाढत चालली आहे. लोकांच्या मुलभूत अधिकारांवर गदा येत आहे. कर्जमाफी, शेतकर्यांच्या आत्महत्या, सरकारची जाहिरातबाजी हे सर्व गंभीर आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सुरु असलेल्या राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात उपस्थित नेते व पदाधिकार्यांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते.
शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले
पवार म्हणाले, देशात आणि राज्यात चिंता करण्यासारखी परिस्थिती आहे. या देशाच्या जनतेला प्रचंड आश्वासने दिली गेली होती. प्रधानसेवक म्हणून काम करू, असे चित्र मांडले गेले होते. पण, आता एकाधिकारशाही वाढत चालली आहे. महागाई वाढण्याचे महत्वाचे कारण म्हणजे चुकीचे अर्थकारण. 58 टक्के लोक शेतीक्षेत्रात आहेत. तरीही शेतीमालाला भाव मिळत नाही. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मागील तीन वर्षात देशात आणि राज्यात वाढले आहे. अमरावतीमध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या झाल्या. आत्महत्यांचा आलेख वर चालला आहे, असे पवार म्हणाले. रेल्वे सुरक्षेचा मुद्दा मांडताना पवार म्हणाले, 65 लाख लोक लोकल ट्रेनमधून प्रवास करतात. दिवसाला 10 लोकांचा जीव जातो. तितकेच जखमी होतात. एकूणच रेल्वे प्रवासात सुरक्षा राहिलेली नाही.
राहुल यांच्याकडे राजकीय कौशल्य
देशात चिंतेची स्थिती असून लोकशाहीच्या मूलभूत अधिकारांवर गदा येत आहे. राहुल गांधी यांच्याकडे राजकीय कौशल्य आहे. कष्ट करण्याची तयारी आहे. त्यांनी त्यात सातत्य ठेवावे. केंद्रात आत्तापर्यंत बिगर काँग्रेसची सरकारे टिकली नाहीत. अटलबिहारी वाजपेयी सर्वांना सोबत घेऊन जात होते. राज्यात खोट्या जाहिरातींतून खोटे लाभार्थी दाखवण्याचा प्रकार संतापजनक आहे.
– शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस