नवी दिल्ली – भारतात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत भारतात २ हजार ५५३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर ७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ३ होती, १४ मार्च पर्यंत हा आकडा वाढून १०० वर पोहचला. २४ मार्च रोजी कोरोनाबाधितांची सख्या ५०० वर येऊन पोहचली. तर २९ मार्चनंतर कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजार झाली तर गेल्या ४ दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजाराने वाढून सध्या २ हजारांवर पोहचली आहे. कोरोना संक्रमणाचा अंदाज लावला तर अवघ्या ४ दिवसांत १ हजार रुग्ण आढळून आल्याने हा व्हायरस किती जलदगतीने भारतात पसरतोय हे दिसून येते. देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या २० टक्के रुग्ण तबलीगी जमातीच्या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. ५०० पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. हा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. फक्त दिल्लीत कोरोना व्हायरसचे २९३ रुग्ण आढळून आलेत त्यातील १८२ रुग्ण मरकजशी जोडले गेले होते. राजधानी दिल्लीत मरकज येथे गेलेल्या दोन रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. तर देशात मरकजशी जोडलेल्या १९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.