देशात गत चार महिन्यात 5 हजारहून जास्त स्टार्टअपची नोंदणी

0

नवी दिल्ली: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावरील आर्थिक व्यवहार जवळपास ठप्प झालेले असताना भारतात गत चार महिन्यात तब्बल पाच हजाराहून स्टार्टअपची नोंद झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आत्मनिर्भर भारताच्या नार्‍यानंतर देशभरातील अनेकांनी कोरोनाचे आव्हान संधीत बदलल्याने भारताने जागतिक स्तरावरील ‘स्टार्टअप इकोसिस्टम्स’च्या क्रमवारित तिसर्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे.

उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या एका आकडेवारीनुसार, देशात डिसेंबर महिन्यापर्यंत 41 हजार 190 स्टार्टअप सुरू झाले. कोरोना विषाणू संसर्गाचा भारतात मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्यापूर्वी फेब्रुवारी 2020 मध्ये देशात सुरू होणार्‍या स्टार्टअपची संख्या 29 हजार 017 होती. मिळालेल्या माहितीनुसार, सन 2019 पेक्षा 50 टक्के अधिक स्टार्टअप्सना मान्यता देण्यात आली आहे. अर्थव्यवस्थेतील जाणकार, तज्ज्ञांच्या मतानुसार, देशाच्या विकासातील दशा आणि दिशा यांमध्ये महत्त्वाची भूमिका स्टार्टअप बजावतील. यांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. स्टार्टअप सुरू करण्यासाठी अनेक सुविधा, सवलती देण्यात आल्यामुळे अनेक जण पुढे सरसावले, असे म्हटले जात आहे.

‘या’ क्षेत्रातील स्टार्टअप वाढले
गेल्या काही महिन्यात ई-कॉमर्स, आरोग्य आणि त्यासंबंधी निगडीत विभाग, कृषि, शिक्षण, फिनटेक, डिजिटल टेक्नॉलॉजी, ऊर्जा, वित्त, अंतर्गत सुरक्षा, अंतराळ या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नवीन स्टार्टअपची नोंदणी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय पर्यटन आणि शहरी सेवा, प्राचीन भारतीय जीवन पद्धती यांसारख्या अन्य काही क्षेत्रातही स्टार्टअप सुरू झाले आहेत.