अशोक चव्हाण यांची भाजप सरकारवर टीका
काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचे इंदापुरात आगमन
इंदापूर : देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र व जनतेच्या घरात दारीद्रय अशी भाजप सरकारच्या काळात जनतेची अवस्था झाली आहे. राज्य यांना चालवताच येत नाही, अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. महाराष्ट्र काँग्रेस कमेटी जनसंघर्ष यात्रेचे बुधवारी इंदापुरात आगमन झाले. त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.
सध्या देशात सर्वात मोठा प्रश्न बेरोजगारीचा आहे. युवकांच्या हाताला काम नाही. भाजप सरकार तरुणाईची थट्टा करत आहे. त्यातच राज्यातील सर्वसामान्य जनतेची रोजी रोटी व शेतकरी वर्गाचा कणा असलेले सहकार क्षेत्र व साखर कारखानदारी मोडीत काढण्याचा डाव सरकार आखत असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी यावेळी केला. या सरकारवर मात करायची वेळ आली असून येणार्या 2019 च्या विधानसभा व लोकसभेला पश्चिम महाराष्ट्रातून काँग्रेसचे सर्वात जास्त खासदार व आमदार निवडून आणण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इंदापूरकरांच्या भावना आम्हाला कळालेल्या आहेत. भाऊंच्या तिकीटाची काळजी तुम्ही करू नका. आम्ही सर्वजण मिळून काँग्रेस श्रेष्ठीच्या माध्यमातून चांगला मार्ग काढू. तुम्ही फक्त विधानसभा तयारीला लागा, असे आवाहन त्यांनी यावेळी केली.
भाजप नेत्यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती
भाजप सरकारने सत्तेत येण्या अगोदर अच्छे दिनच्या मोठमोठ्या जाहिराती केल्या. परंतु चार वर्षे झाली तरी अजून अच्छे दिन का आले नाहीत, याचा जाब जनतेने या सरकारला विचारला पाहिजे. भाजपचे नेते खोटे बोलून मस्तवाल झाले आहेत. सत्तेची मस्ती यांच्या डोक्यात भिडली आहे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. बेताल व मस्तवाल वक्तव्य करणार्या भाजपच्या नेत्यांनी 2014 साली सत्तेत येताना बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा दिला होता. सत्तेत आल्यानंतर मात्र बेटी भगाओचा नारा देत असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी आमदार राम कदम यांच्यावर केली. यावेळी हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, बाळासाहेब विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधीत करताना भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली.
मोटारसायकल रॅली
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीने 31 ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथील करविर निवासीनी महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन मशाल पेटवून जनसंघर्ष यात्रेला सुरूवात केली. ही यात्रा पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट करून बुधवारी सकाळी पुणे जिल्ह्यातील इंदापुरातील श्रीराम वेस चौकात सकाळी 11.30 वाजता पोहचली. 5 हजार मोटारसायकलींची रॅली काढून जनसंघर्ष यात्रेची इंदापूर शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जनसंघर्ष रथामध्ये माजी मुख्यमंत्री आशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार जयकुमार गोरे, सतेज पाटील, रामहरी रूपनवर, संजय जगताप, मुरलीधर निंबाळकर, यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर तर आभार अॅड. कृष्णाजी यादव यांनी मानले.
माजी मुख्यमंत्र्यांना लागल्या झोपा…
इंदापूर येथे जनसंघर्ष यात्रेची जाहीर सभा चालू असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण यांना झोप अनावर झाली. त्यामुळे कार्यक्रमादरम्यान सभा चालू असताना त्यांनी स्टेजवरच झोप काढली. हे चित्र पाहून नागरिकांमध्ये हशा पिकला होता.