देशात न्यायाधीशांच्या कमतरतेमुळे महत्वाचे खटले प्रलंबित

0

साक्री । भारतातील प्रत्येक दहा लाख लोकसंख्येमागे 20 न्यायाधीश आहेत. यामुळे न्यायालयातील वाढत्या प्रलंबित खटल्यांना न्यायाधीशांची कमी संख्या व क्लिष्ट कायदे जबाबदार आहेत. म्हणून न्याय मिळवण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग हा सामोपचाराचा असून लोकअदालत असे समोपचार घडवून आणते, अशी माहिती देत लोकअदालतचे महत्व न्यायमुर्ती एस. एम. देशपांडे यांनी कायदे विषयक शिबिरात विषद केली. शहरातील श्री छत्रपती शिवाजी सार्वजनिक वाचनालय येथे शिवकल्याण प्रतिष्ठान, साक्री व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने कायदे विषयक शिबिर आयोजित करण्यात आले होते.

जिल्हा न्यायाधीशांच्या हस्ते उद्घाटन
अध्यक्ष व उद्घाटक जिल्हा न्यायाधीश पी. सी. बावस्कर हे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हान्यायाधीश नं.1 एस. एस. शिंदे, जिल्हा न्यायाधीश नं.2 एस. एम. देशपांडे, जिल्हा सत्र न्यायाधीश नं.4 बांगर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश ए. एच. सय्यद, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर सौ. एम. ए. मोटे, जे. ए. शेख, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर साक्री आर. एस. वानखेडे, सह दिवाणी न्यायाधीश साक्री आर. ए. शिवरात्रे उपस्थित होते.

यांनी पाहिले कामकाज
याचबरोबर प्रमुख व्याख्याते अ‍ॅड. जितेंद्र निळे, अ‍ॅड. दीपक जोशी, अ‍ॅड. चंद्रकांत येशीराव, अ‍ॅड. वानखेडे व अ‍ॅड. आर. ए. पाटील आदींनीही उपस्थितांना विविध कायद्यांची माहिती सांगून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण तोरवणे तर आभार अ‍ॅड. आर. जे. पाटील यांनी मानलेत. यशस्वीतेसाठी शिवकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनराज चौधरी, उपाध्यक्ष पंकज सोनवणे, सचिव खुशी चौधरी, कैलास गायकवाड, परमेश्वर रामोळे, छोटू चौधरी, दीपक क्षीरसाठ, विशाल देसले व योगेंद्र शिंदे आदींनी कामकाज पाहिले.

शेतकरी आत्महत्त्यांवर चिंता
व्याख्याते म्हणून धुळे येथील अ‍ॅड. जितेंद्र निळे, अ‍ॅड. दीपक जोशी, अ‍ॅड. चंद्रकांत येशीराव, भावना पिसोळकर, अ‍ॅड. चेतना पिसोळकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायमुर्ती पी. सी. बावस्कर यांनी सांगितले की, शेतकर्‍यांना एक ते दोन लाखांसाठी कराव्या लागणार्‍या आत्महत्या खेदजनक आहेत. शेतकरी आत्महत्या ह्या विषयावर जनजागृती करून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या करणार नाही यासाठी सर्वांनी कार्य करायला हवे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.