मुंबई : देशात भाजपच्या राजवटीत काळजी करण्यासारखं वातावरण निर्माण झाल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हंटले आहे. जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात मतपेटीतून नाराजी व्यक्त करत काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, राहुल गांधी महाआघाडीचे पंतप्रधान असतील का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता राहुल यांनीच पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये नसल्याचं स्पष्ट केल्याचं पवार यांनी सांगितलं. मीडिया अशा प्रकारचा प्रचार का करत आहे?, असा सवालही त्यांनी केला. दरम्यान, २०१९ मध्ये शिवसेना आणि भाजपची युती होणार असल्याचा दावाही प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी यांनी केला.
देशातील स्वायत्त संस्थांवर झालेला हल्ला जनतेला पटला नाही. शिवाय सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीमध्ये पैशाचा भरमसाठ वापर केला. त्यामुळेच पाचही राज्यात भाजपला सपाटून मार खावा लागला असे पवार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीने यूपीएसोबत येण्याचं आवाहनही केलं. केंद्रातील भाजप सरकारनं अत्यंत आक्रमक प्रचार केला. त्यांनी व्यक्तिगत हल्ले केले. मतदारांना ते पटलं नाही. शिवाय नेहरू-गांधी कुटुंबाला या प्रचारात टार्गेट करण्यात आलं. आजच्या पिढीने जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधींना पाहिलं नाही. दहा वर्षात जे घडलं ते त्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे मतदारांनी भाजपच्या या व्यक्तिगत हल्ल्यांना थारा दिला नाही. केंद्र सरकारने देशातील स्वायत्त संस्थांवर हल्ला चढवला. या संस्थांवर अंकूश ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रिझर्व्ह बँकेलाही सोडलं नाही. असंही पवार म्हणाले.