पुणे : देशात यंदाही गेल्या वर्षीप्रमाणेच चांगला पाऊस होईल. तसेच, शेतकर्यांच्या पेरण्या नियोजित कालावधीत पार पडतील. यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’चा फारसा प्रभाव असणार नाही, असे मत हवामान अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. हवामान खात्यानेही यास दुजोरा दिल्याने शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे.
देशातील शेती मान्सूनवर अवलंबून आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून देशात दाखल होतो आणि पुढील महिनाभरात टप्प्याटप्प्याने देश व्यापून टाकतो. सप्टेंबरमध्ये राजस्थानमधून मान्सून माघारी फिरतो. त्यामुळे देशातील पाणी आणि शेतीसाठी हे चार महिने अत्यंत महत्त्वाचे ठरतात. या मान्सूनवर प्रभाव टाकणारा ‘एल निनो’ हा एक महत्त्वाचा घटक आहे.
हा ‘एल निनो’ यंदा सक्रिय होणार असल्याचा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने काही दिवसांपूर्वी वर्तवला होता. ऑस्ट्रेलियातील हवामान खात्याने 28 फेब्रुवारीस नोंदवलेल्या निरीक्षणानुसार प्रशांत महासागरात ‘एल निनो’ च्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरणारी परिस्थिती दिसून आली आहे. पण भारतीय हवामान खात्याने देशातील मान्सूनवर ‘एल निनो’चा परिणाम होणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
परिणाम अत्यल्प राहणार
यंदा मान्सूनच्या सुरूवातीच्या महिन्यांत ‘एल निनो’चा फटका बसणार नाही. मान्सूनच्या चार महिन्यांच्या काळात शेवटच्या टप्प्यात ‘एल निनो’ सक्रिय होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. हवामान खात्यातील वरिष्ठांच्या माहितीनुसार शेवटच्या टप्प्यातही ‘एल निनो’ चा प्रभाव फारसा जाणवणार नाही. त्यामुळे शेतकर्यांच्या पेरण्या नियोजित कालावधीत पार पडण्याची शक्यता वाढली आहे.
असा होतो परिणाम…
प्रशांत महासागराचे तापमान वाढल्याने सामान्यपणे दक्षिण अमेरिकेकडून आशियाच्या दिशेने वाहणारे वारे मंदावतात. त्याचा परिणाम भारतातील मोसमी पावसावर होतो. अशा वेळी भारतीय उपखंडात सरासरीपेक्षा कमी पाऊस होतो. गेल्या 140 वर्षांत निम्म्याहून अधिक वेळा भारतातील प्रमुख दुष्काळांची वेळ ‘एल निनो’शी जुळून आली आहे.
‘एल निनो’ची चिंता नको
सध्याच्या घडीला आपल्याला ‘एल निनो’ची चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. ‘एल निनो’चा प्रभाव जुलैनंतर जाणवायला लागेल. याशिवाय, त्याचा मान्सूनवर परिणाम होईलच असे नाही. तो केवळ नैऋत्य मान्सूनवर प्रभाव टाकणार्या अनेक घटकांपैकी एक असेल.
-के. जे. रमेश, महासंचालक, हवामान विभाग