नवी दिल्ली : देशात आज सत्याचा गळा घोटला जात आहे. हिटलरच्या राजवटीतही हेच व्हायचे. वास्तवावर मजबूत पकड ठेवा म्हणजे कधीही त्याची मुस्कटदाबी करता येईल, असे हिटलरचे वाक्य होते. आज आपल्या अवती-भवती तेच चालले आहे, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी बेंगळुरू येथील एका कार्यक्रमात केली. राहुल यांनी थेट मोदींवर अशाप्रकारची टीका केल्याने भाजपकडून त्यावर ताबडतोब प्रत्युत्तर आले. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी या टीकेला लागलीच उत्तर दिले.
42 वर्षं उशीर झाला : इराणी
नरेंद्र मोदी यांच्या सरकारची जर्मनीच्या नाझी हुकूमशाही राजवटीशी तुलना केल्याने स्मृती इराणी यांनी ट्विटच्या माध्यमातून राहुल गांधी यांचा चांगलाच समाचार घेतला. राहुल यांच्या हुकूमशाहीच्या आरोपाचा समाचार घेताना इराणी यांनी राहुल गांधींना देशाच्या माजी पंतप्रधानांनी इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीची आठवण करून दिली आहे. देशावर आणीबाणी कुणी लादली? कुणी लोकशाहीचा गळा घोटला आणि हिटलरपासून नेमकी प्रेरणा कुणी घेतली हे सर्वांनाच माहीत आहे. तुम्हाला हे कळायला 42 वर्षं उशीर झाला आहे. पण त्यासाठी काहीही बक्षीस नाही, अशी बोचरी टिप्पणी इराणी यांनी केली.