मुंबई : सध्या देशात वैचारिक दहशतवाद सुरू आहे. देशाला तोडण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. कोणी ओबीसींच्या नावावर, तर कोणी एसटी एससीच्या नावाने, तर कोणी धर्मांच्या नावाने, तर कोणी वेगवेगळ्या प्रांत आणि भाषांच्या नावाने हे मला पटतच नाही, असे योगगुरू बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. एक अखंड भारत, ज्याचा पाया सरदार वल्लभभाई पटेल यांनी रचला. अखंड भारताचे स्वप्न पाहिले. छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप यांनी यासाठी संघर्ष केला, या साऱ्यांचे बलिदान आपण विसरायला नको, असे बाबा रामदेव यांनी नमूद केले.
आपण जिथून प्रवास सुरु केला, शेती क्षेत्र, उद्योग क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, संशोधनात आणि समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात कोणतंही राष्ट्र पुढे जाते, तेव्हा गोष्ट एका तत्वाची नसते, तर समाज जीवनाच्या सर्व तत्वांचा सर्वसमावेशी, सर्वांगीण विकास होतो. तसेच अद्यापही अनेक गोष्टींसाठी आपण चीनवर अवलंबून आहोत. अनेक गोष्टींसाठी युरोपातील कंपन्यांवर निर्भर आहोत. त्यामुळे सर्वच क्षेत्रात आपल्याला आत्मनिर्भर होण्याची गरज आहे, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. आपण राजकीय गुलामगिरीतून मुक्त झालोय, पण आर्थिक, सांस्कृतिक, वैचारिक गुलामगिरीतून भारत कधी मुक्त होणार? हा प्रश्न माझ्या मनात नेहमीच असतो. जातीपातीचा भेदभाव, प्रांतिय भेदभाव, भाषेत भेदभाव, मला या सर्व गोष्टींतून भारताला मुक्त झालेले पाहायचे आहे, अशी अपेक्षा बाबा रामदेव यांनी व्यक्त केली आहे.