देशात सर्वाधिक तापमान महाराष्ट्रात

0

पुणे : उन्हाळ्याने आता चांगलाच जोर धरला असून सूर्य आग ओकू लागला आहे. विशेषतः महाराष्ट्रात प्रचंड उकाडा जाणवत असून तापमानात मोठी वाढ झाली आहे. हवामानाचा अभ्यास करणार्‍या स्कायमेट वेदर या संस्थेने रविवारी देशभरातील सर्वांत उष्ण दहा ठिकाणांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात दहा पैकी सहा शहरे ही महाराष्ट्रातील आहेत. आश्‍चर्याची बाब म्हणजे पहिली चार शहरे देखील राज्यातील आहेत. या यादीनुसार रविवारी देशात सर्वाधिक तापमान महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील भिरा येथे तब्बल 43 अंश सेल्सियस इतके नोंदविण्यात आले.

41 अंशाच्या पुढे तापमान
स्कायमेट वेदरच्या आकड्यांनुसार या दहाही ठिकाणी तापमान 41 अंश सेल्सियसच्या पुढे आहे. याच संस्थेने रविवारी नोंदविलेल्या तापमानानुसार पुण्यामध्ये कमाल तापमान 39 तर किमान तापमान 20 अंश सेल्सियस इतके होते. स्कायमेटच्या नोंदीप्रमाणे सर्वाधिक उष्णता असलेली दहा शहरे पुढील प्रमाणे : भिरा (महाराष्ट्र), चंद्रपुर (महाराष्ट्र), अकोला (महाराष्ट्र), मालेगाव (महाराष्ट्र), तितलगढ (ओडिसा), अमरावती (महाराष्ट्र), अंगुल (ओडिसा), करनूल (आंध्रप्रदेश), अदिलबाद (तेलंगणा), ब्रह्मपुरी (महाराष्ट्र).

पुण्याच्या तापमानात वाढ
सोमवारी पुण्यात पारा पहिल्यांदा यंदाच्या उन्हाळयात 40 अंश सेल्सियस पर्यंत पोहचण्याची आणि पुढील चार दिवस कमाल तापमान 40 अंश राहण्याची शक्यता आहे. शहरात आणि राज्यात किमान आणि कमाल तापमानामध्ये सरासरीच्या तुलनेत 2 ते 4 अंशाने वाढ झाली आहे.

पुढील दोन महीने त्रासदायक
पुण्याच्या तापमानामध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मध्यवर्ती पुणे शहरापेक्षा लोहगाव आणि पाषाणमध्ये तापमान सुमारे एक अंशाने जास्त आहे. येथे तापमानाची नोंद 4 ते 5 अंशाने अधिक होत आहे. मार्च महिन्यात पुण्यात एवढे तापमान पूर्वी कधीच अनुभवले नव्हते. मार्च महिन्यात जर तापमानात एवढी वाढ होत असेल तर येत्या दोन महिन्यांत उन्हाळा किती तापदायक ठरेल यावर सध्या चिंता व्यक्त होत आहे.

तापमानाचा उच्चांक
2002 नंतर पुण्यात मार्च महिन्याच्या तापमानात वाढ अधिक होऊ लागली. 1990च्या दशकातील मार्च महिन्यातील सर्वाधिक उष्णतेचे आकडे पाहिले असता तापमान 30 ते 33 अंश सेल्सियस दरम्यान होते. 1991 ते 2002 दरम्यान मार्च महिन्यात सर्वाधिक तापमान 1999 साली नोंदविण्यात आले होते आणि ते केवळ 33.5 अंश सेल्सियस इतकेच होते. एवढेच नव्हे तर सर्वाधिक उष्ण मानल्या जाणार्‍या एप्रिल आणि मेमध्ये देखील या दशकात पुण्यात तापमान 40 अंशापर्यंत जात नव्हते. 35 अंश तापमान सर्वाधिक मानले जायचे.

पाऊसाची शक्यता
पुणे वेधशाळेने शनिवारी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार येत्या 48 तासात तापमानात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात पुढील तीन दिवस तापमान वाढत राहिल आणि नंतर तापमान कमी होण्यास सुरूवात होईल. 28 मार्चपासून आकाशात ढग येण्याची शक्यता आहे. 28 व 29 मार्च रोजी आकाश अंशत ढगाळ राहील आणि 30 व 31 मार्चला दुपारनंतर गडगडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

देशातील दहा उष्ण शहरे
शहर राज्य कमाल तापमान
भिरा महाराष्ट्र 43.0
चंद्रपूर महाराष्ट्र 42.2
अकोला महाराष्ट्र 42.0
मालेगाव महाराष्ट्र 41.8
तितलगढ ओडिसा 41.6
अमरावती महाराष्ट्र 41.2
अंगुल ओडिसा 41.1
कुरनूल आंध्रप्रदेश 41.1
आदिलबाद तेलंगाना 41.0
ब्रह्मपुरी महाराष्ट्र 41.0